संसदेचे हिवाळी अधिवेशन अखेरच्या टप्प्यात आहे. परंतु नोटाबंदीवरून संसदेत सुरू असलेला गोंधळ कमी होण्याचे नाव घेताना दिसत नाही. गुरूवारी नोटाबंदीचा निर्णय हा मुर्खपणा असल्याची टीका केल्यानंतर राहुल गांधींनी शुक्रवारी पुन्हा पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला आहे. नोटाबंदीचा निर्णय हा भारताच्या इतिहासातील सर्वात मोठा घोटाळा असून मला याबाबत संसदेत बोलायंच आहे. मी तिथं सर्व बोलणार असल्याचे सांगत संसदेत मला बोलण्याची परवानगी दिल्यास राजकीय भूकंप झाल्याशिवाय राहणार नाही, असा दावाही त्यांनी केला.

गेल्या एक महिन्यांपासून आम्ही सरकारला नोटाबंदीवर चर्चा करण्याची मागणी करत आहोत. पण आमच्या मागणीकडे दुर्लक्ष केले जात आहे. चर्चा झाल्यास ‘दूध का दूध, पानी का पानी’ होऊन जाऊ दे, असे त्यांनी म्हटले. पंतप्रधान देशभरात भाषणे देत फिरत आहेत. पण लोकसभेत बोलण्यास ते का घाबरत आहेत, असा सवाल केला. नोटाबंदीचा निर्णय हा भारतीय इतिहासातील आतापर्यंतचा सर्वात मोठा घोटाळा असल्याचा दावाही त्यांनी केला. सरकार चर्चेपासून पळत असल्याचा आरोप त्यांनी केला.

दरम्यान, शुक्रवारी सकाळी संसदेच्या दोन्ही सभागृहाचे कामकाज सुरळित होईल, अशी शक्यता वर्तवण्यात आली होती. परंतु नोटाबंदीवर पंतप्रधानांच्या स्पष्टीकरणाची मागणी करत विरोधी पक्षांनी पुन्हा गोंधळ घातला. त्यामुळे लोकसभेचे कामकाज बुधवारपर्यंत स्थगित करण्यात आले.

नरेंद्र मोदी यांनी घेतलेला नोटाबंदीचा निर्णय हा बोल्ड नव्हे तर मूर्खपणाचा आहे, अशी टीका राहुल गांधी यांनी गुरूवारी केली होती. केंद्र सरकारच्या नोटाबंदीच्या निर्णयाला एक महिना पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसकडून काळा दिवस साजरा करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. नरेंद्र मोदी यांनी महिनाभरापूर्वी मनाला वाटले म्हणून आर्थिक प्रयोग करून पाहिला. या निर्णयामुळे देशातील गरीब, शेतकरी आणि रोजंदारीवर काम करणारी जनता उद्ध्वस्त झाली आहे. आम्हाला संसदेत या सगळ्यावर चर्चा व्हावी असे वाटते. यावर मतदान झाले पाहिजे. मात्र, सरकार त्यासाठी तयार नाही. अनेकजण मोदी यांचा निर्णय बोल्ड असल्याचे म्हणतात. मात्र, कोणताही विचार न करता घेण्यात आलेला हा निर्णय बोल्ड नव्हे तर मूर्खपणाचा असल्याचे राहुल गांधी यांनी म्हटले होते.