राहुल गांधी यांची टीका; पंतप्रधानही निव्वळ घोषणाबाजी करत असल्याचा आरोप

काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर सोमवारी जोरदार हल्ला चढविला. मुख्यमंत्री झाल्यानंतर ममता बॅनर्जी यांनी दिलेली आश्वासने पाळली नाहीत त्यामुळे विधानसभेच्या निवडणुकीत काँग्रेस त्यांच्याविरोधात उभी ठाकली आहे, असे गांधी म्हणाले.

पाच वर्षांपूर्वी काँग्रेसने तृणमूल काँग्रेसला पाठिंबा दिला होता. ममता यांनी तेव्हा परिवर्तन आणण्याचे, विकासाचे, युवकांना रोजगार देण्याचे आणि कायदा आणि सुव्यवस्था सुधारण्याचे आश्वासन दिले होते. मात्र मुख्यमंत्री होताच ममतांच्या वर्तणुकीत बदल झाला आणि त्या दिलेली आश्वासने विसरल्या, असे राहुल गांधी म्हणाले.

रोजगारासाठी अन्य राज्यांमध्ये जाणाऱ्या युवकांना रोखण्यासाठी राज्यात कारखाने उभारून युवकांना रोजगार देण्याचे आश्वासन ममता  बॅनर्जी यांनी दिले होते. मात्र अद्याप एकही कारखाना उभारण्यात आला नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मेक इन इंडिया घोषणा केली आणि युवकांना रोजगार मिळेल असे सांगितले. जनतेने त्यांना निवडून दिले युवकांना रोजगार मिळाला नाही, ममतांनीही रोजगार देण्याचे आश्वासन दिले होते, मात्र काहीही झाले नाही, असे राहुल गांधी म्हणाले.