जम्मू-काश्मीर राज्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या दहशतवादी कारवायांवरून काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार टीकास्त्र सोडले. केंद्रात भाजपचे सरकार आल्यापासून काश्मीर खोऱ्यातील दहशतवादी कारवाया वाढलेल्या आहेत, अशी टीका राहुल यांनी केली.
‘‘गेली दहा वष्रे केंद्रात काँग्रेसचे आघाडी सरकार होते. या कालावधीत या राज्यात शांतता नांदत होती आणि पर्यटक पर्यटनाचा मनमुराद आनंद घेत होते. मात्र केंद्रात नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सरकार आले आणि दहशतवादी कारवाया सुरू झाल्या,’’ असा हल्लाबोल राहुल यांनी केला.
झारखंड राज्यातील रामगड येथे निवडणूक प्रचारसभेत ते बोलत होते. ‘‘मोदी कुठेही निवडणूक प्रचार सभा घेण्यासाठी गेले, तर तिथे हिंसाचार होतोच. महाराष्ट्र, दिल्ली, उत्तर प्रदेश या राज्यांच्या विधानसभा निवडणुकीच्या काळात मोदी प्रचारासाठी गेले असता हिंसाचार झाला होता. दोन विविध धर्मामध्ये दुफळी आणि वाद निर्माण करण्याचे काम मोदी करतात,’’ असे राहुल म्हणाले.
‘‘काश्मीरमध्ये दहशतवादी कारवायांमध्ये हुतात्मा झालेल्या सैनिक व पोलिसांना माझा सलाम आहे. या हल्ल्यांमध्ये मृत झालेल्या सामान्य नागरिकांच्या कुटुंबीयांविषयी सहानुभूतीही आहे. मात्र पाकिस्तानच्या मदतीने करण्यात आलेल्या या दहशतवादी हल्ल्यांचा बीमोड केला पाहिजे,’’ असे राहुल गांधी यांनी सांगितले.