जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील (जेएनयू) विद्यार्थी संघटनेचा अध्यक्ष कन्हैय्या कुमार याच्या अटकेप्रकरणी विरोधकांकडून सुरू असलेल्या टीकेचा भाजपने समाचार घेतला. विरोधक हे लष्कर-ए-तय्यबा या दहशतवादी संघटनेसारखी भाषा बोलत असून हा शहीदांचा अपमान आहे. त्यामुळे देशविरोधी शक्तींना बळ मिळत असल्याचा आरोप भाजपने केला. ‘जेएनयू’मध्ये काही मुठभर लोकांनी काढलेल्या देशविरोधी मोर्चाचा संपूर्ण भारतातून निषेध होत आहे. मात्र, काँग्रेस पक्ष राजकीय द्वेष आणि व्होटबँकेच्या राजकारणातून मोदी सरकारला लक्ष्य करत असल्याचा आरोप भाजपने केला. राहुल गांधी आणि त्यांचे साथीदार ‘जेएनयू’तील आंदोलनाला पाठिंबा दर्शविणारा लष्कर-ए-तय्यबाचा म्होरक्या हाफिज सईदची भाषा बोलत आहेत. हा भारतीय सीमेचे प्राणपणाने रक्षण करणाऱ्या आमच्या देशातील शहिदांचा अपमान आहे. ‘जेएनयू’ने विचारवंत आणि अधिकारी घडवले आहेत. काही मुठभर लोक तेथे देशविरोधी भाषणे देत आहेत. कायदा त्याची जबाबदारी पाडत आहे. राजकीय स्वार्थासाठी काँग्रेसने शहीदांचा अपमान करू नये, अशी आमची विनंती असल्याचे भाजपचे राष्ट्रीय सचिव श्रीकांत शर्मा यांनी सांगितले.
संसदेवरील हल्ला प्रकरणातील गुन्हेगार अफजल गुरू याच्या फाशीबाबत मंगळवारी जवाहरलाल नेहरू विद्यापीठाच्या आवारात निषेध कार्यक्रम घेऊन घोषणाबाजी केल्या प्रकरणी विद्यार्थी संघटनेचा अध्यक्ष कन्हैय्या कुमार याला शुक्रवारी देशद्रोह आणि गुन्हेगारी कटाच्या आरोपावरून अटक झाली होती. दिल्ली न्यायदंडाधिकाऱ्यांनी त्याला तीन दिवसांची पोलीस कोठडी दिली आहे.