काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी आता सराफांच्या प्रश्नाला पाठिंबा देत बुधवारी भाजपच्या सरकारवर जोरदार हल्ला चढविला. बिगर चांदीच्या दागिन्यांवर एक टक्का अबकारी कर लावणे म्हणजे भाजप सरकारने केलेला व्यापाऱ्यांच्या हत्येचा प्रयत्न आहे आणि तो बडय़ा उद्यागपतींच्या फायद्यासाठी आहे, असे गांधी यांनी म्हटले आहे.
अखिल भारतीय सराफ आणि स्वर्णकार महासंघाचा मेळावा जंतरमंतर येथे आयोजित करण्यात आला होता तेव्हा राहुल गांधी बोलत होते. या वेळी केंद्राच्या ‘मेक इन इंडिया’ची त्यांनी खिल्ली उडविली. ‘मेक इन इंडिया’चे बोधचिन्ह असलेल्या बब्बर शेरची छोटय़ा व्यापाऱ्यांच्या गळ्याचा घोट घेण्याची इच्छा आहे असे वाटते, असेही ते म्हणाले. केंद्राने अबकारी कर लादलेला नाही तर तुमच्या हत्येचा हा प्रयत्न आहे, असे राहुल म्हणाले.