काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी शुक्रवारी बंगळुरू येथे झालेल्या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर घणाघाती टीका केली. सध्या एकापाठोपाठ एक करून देशातील लोकशाही संस्थांवर पद्धतशीरपणे ताबा मिळवला जात आहे. यामध्ये पंतप्रधान , सरकारी अधिकारी आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा सहभाग आहे. हे सर्व मिळून देशाच्या आवाजाला गुलाम बनवू पाहत आहेत, असा सणसणीत टोला राहुल यांनी लगावला.

कर्नाटक सरकारकडून बंगळुरू येथे आयोजित करण्यात आलेल्या ‘क्वेस्ट फॉर इक्विटी’ या कार्यक्रमात ते बोलत होते. ‘राजा विवस्त्र आहे, पण हे सांगण्याचं धाडस कोणाकडेच नाही’, असे सांगत राहुल यांनी पंतप्रधान मोदींवर अप्रत्यक्षपणे निशाणा साधला. याशिवाय, सध्या देशात सत्याचा गळा दाबला जात असल्याचेही त्यांनी म्हटले. सरकार जनतेचा आवाज चिरडत आहे. तसेच गरीब व दुर्बलांना पायदळी तुडवत आहे. भाजपला संपूर्ण देशावर खोट्याचा मुलामा चढवायचा आहे. जेणेकरून त्यांना अपेक्षित असलेल्या राजेशाहीच्या काळात देशाला नेता येईल, ज्या ठिकाणी लोकांना कोणतेही अधिकार नसतील, ज्या ठिकाणी करोडो भारतीय अस्पृश्य ठरतील, असे राहुल यांनी म्हटले.

यावेळी राहुल गांधी यांनी नोटाबंदीच्या मुद्द्यावरूनही सरकारला लक्ष्य केले. सरकारमधील नेते जाहीर व्यासपीठांवर नोटाबंदीच्या निर्णय म्हणजे मास्टर स्ट्रोक असल्याचे सांगतात. मात्र, खासगीत या निर्णयाला शुद्ध वेडसरपणा म्हटले जाते. या निर्णयामुळे हजारो उदयोगधंदे बंद पडले, अनेकजणांचा जीव गेला. मात्र, याविषयी संसदेत बोलण्याऐवजी मोदी ‘कोल्ड प्ले’सारख्या कार्यक्रमात बोलणे पसंत करतात, असे राहुल यांनी सांगितले. तसेच देशभरात गोरक्षकांकडून सुरू असलेल्या हिंसाचारावरही त्यांनी भाष्य केले. सरकार म्हणते रोहित वेमुल्लाने आत्महत्या केली. मात्र, त्याची हत्या झाली आहे. त्याला भोगाव्या लागलेल्या अपमानास्पद वागणुकीने त्याचा बळी घेतला. तो दलित असल्यामुळे त्याची हत्या झाली, असे राहुल गांधी यांनी म्हटले.