शेतकऱ्यांच्या हिताला धक्का लावाल तर गाठ आमच्याशी आहे, आम्ही खंबीरपणे त्यांच्या पाठीशी आहोत, असे काँग्रेस पक्षाचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी  शेतकरी मेळाव्यात सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जमीन अधिग्रहण विधेयक सुधारित स्वरूपात आणून उद्योगपतींनी लोकसभा निवडणुकीत केलेल्या कर्जाची परतफेड केली आहे, असा आरोपही त्यांनी केला.
अवकाळीग्रस्त शेतकऱ्यांच्या जखमेवर सरकारने मीठ चोळले आहे, असे काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी सांगितले. नवीन जमीन अधिग्रहण विधेयक म्हणजे आम्ही २०१३ मध्ये आणलेल्या विधेयकाचे कमकुवत रूप आहे. आम्ही शेतकऱ्यांना सक्षम करणारे विधेयक आणले. भाजपचे मात्र तसे नाही. राहुल गांधी यांना पुन्हा एकदा काँग्रेसचे नेते म्हणून जनतेच्या मनावर ठसवण्याचा प्रयत्न  रामलीला मैदानावरील या शेतकरी मेळाव्यात करण्यात आला. शेतकऱ्यांचे हित धोक्यात आणून उद्योगपतींना फायद्याचे निर्णय घेणाऱ्या मोदी सरकारशी सर्वतोपरी लढा देऊ, असे राहुल गांधी यांनी सांगितले.
गेल्या वर्षी वेगवेगळी आश्वासने देऊन निवडून आलेल्या मोदी सरकारने आता शेतकरी विरोधी धोरणांचा अवलंब केला आहे असे सोनिया, राहुल व मनमोहन सिंग या तिघांनीही सांगितले. ५७ दिवसांच्या सुटीवरून आल्यानंतर राहुल प्रथमच सार्वजनिक कार्यक्रमात उपस्थित होते.

“गुजरातमध्ये मोदींनी शेतकऱ्यांच्या जमिनी हिसकावल्या व देशातही आपण हे करू शकतो असा विश्वास उद्योगपतींना दिला, हेच त्यांचे गुजरात मॉडेल होते.”
राहुल गांधी</strong>