विद्यार्थ्यांचा कितीही विरोध असला तरी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ‘एफटीआयआय’च्या अध्यक्षपदी गजेंद्र चौहानच हवे असतील, तर भाजपमधील कोणीही चौहान यांना हटवू शकत नाही. देशात एकाधिकारशाही सुरू असल्याचे हे उदाहरण आहे, असे काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी ‘एफटीआयआय’च्या आंदोलक विद्यार्थ्यांशी संवाद साधताना म्हणाले.
गजेंद्र चौहान यांच्या अध्यक्षपदाच्या नियुक्तीविरोधात आंदोलन करणाऱ्या ‘एफटीआयआय’च्या विद्यार्थ्यांची शुक्रवारी राहुल गांधी यांनी भेट घेतली. यावेळी विद्यार्थ्यांनी राहुल यांच्यासमोर आपले गा-हाणे मांडले. आम्हाला हिंदूविरोधी आणि नक्षली ठरविण्याचा प्रकार सुरू असल्याचे विद्यार्थ्यांनी राहुल यांना सांगितले. यावेळी राहुल यांनी केंद्रावर हल्लाबोल करीत केवळ २५० विद्यार्थ्यांमुळे सरकार एवढे त्रस्त का? असा सवाल उपस्थित केला. केंद्राच्या मताशी तुम्ही सहमत नसाल, तर तुमची आंदोलने चिरडली जातात. मी तुमच्या पाठिशी उभा आहे पण तुम्ही खंबीर असले पाहिजे, असे म्हणत राहुल यांनी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शवला.
शाळेतल्या विद्यार्थ्यांप्रमाणे गेल्या महिन्याभरापासून खेळखंडोबा सुरू आहे. संघाचे विचार विद्यार्थ्यांवर थोपले जात आहेत, असा घणाघात राहुल यांनी केला.
एकीकडे राहुल गांधी विद्यार्थ्यांशी चर्चा करीत असताना गेटजवळ भाजप कार्यर्त्यांची राहुल यांच्या विरोधात जोरदार निदर्शेने सुरू आहेत.
दरम्यान, एफटीआयआयच्या विद्यार्थ्यांचा आज आंदोलनाचा ५० वा दिवस आहे. अशा संस्थांमध्ये सरकारचा सुरू असलेला वाढता हस्तक्षेप थांबवण्यासाठी प्रयत्न करावेत अशी मागणी विद्यार्थ्यांनी राहुल यांच्याकडे केली होती. विद्यार्थ्यांच्या विनंतीवरून राहुल यांनी विद्यार्थ्यांची भेट घेतली. चौहान यांच्या नियुक्तीच्या निषेधार्थ विद्यार्थी महिन्याहून अधिक काळ संपावर गेले आहेत. या संदर्भात ३ जुलै रोजी माहिती व प्रसारण मंत्री अरुण जेटली यांच्यासोबतची चर्चा फिस्कटली होती. चौहान यांची एफटीआयआयच्या अध्यक्षपदी झालेली नियुक्ती रद्द होईपर्यंत आंदोलन मागे घेणार नसल्याचा इशारा विद्यार्थी संघटनेने दिला आहे. चित्रपटसृष्टीतील अनेक दिग्गज व्यक्तींनी विद्यार्थ्यांच्या या आंदोलनाला यापूर्वीच पाठिंबा दिला आहे.