पंजाबमधील शेतकऱयांच्या समस्या जाणून घेण्यासाठी कॉंग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी मंगळवारी रेल्वेच्या जनरल डब्यातून प्रवास केला. प्रवासात त्यांनी डब्यातील सहप्रवाशांशीही संवाद साधला.
पंजाबमधील अवकाळी पावसामुळे तेथील शेतकऱयांचे झालेले नुकसान जाणून घेण्यासाठी राहुल गांधी मंगळवारी पंजाबच्या दौऱयावर आहेत. अवकाळी पाऊस आणि जाचक खरेदी प्रक्रिया याला कंटाळल्यामुळे पंजाबमध्येही अनेक शेतकऱयांनी आत्महत्या केली आहे. या पार्श्वभूमीवर शेतकऱयांशी संवाद साधण्यासाठी राहुल गांधी पंजाबला गेले आहेत.
पंजाबमधील शेतकऱयांच्या प्रश्नाकडे केंद्र सरकारचे लक्ष वेधण्यासाठी मुख्यमंत्री प्रकाशसिंह बादल यांनी आपल्या मंत्रिमंडळातील मंत्र्यांसह पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानाबाहेर धरणे आंदोलन करावे, अशी टीका कॉंग्रेसचे नेते अमरिंदर सिंग यांनी केली आहे.