राहुल गांधी पुढच्या आठवड्यात नवी दिल्लीत परतत असून, त्यानंतर ते संसदेच्या कामकाजात सहभागी होणार असल्याची माहिती माजी केंद्रीय मंत्री आणि पक्षाचे ज्येष्ठ नेते कमलनाथ यांनी दिली.
गेल्या महिन्यात संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू झाल्यापासून राहुल गांधी ‘गायब’ असल्यामुळे अनेक चर्चांना उधाण आले होते. राहुल गांधी यांनी पक्षाकडे रितसर परवानगी घेऊन सुटी घेतल्याची माहिती कॉंग्रेसकडून देण्यात आली होती. मात्र, सुटी घेऊन ते नक्की कुठे गेले आहेत. यावर पक्षाने अधिकृतपणे कोणताही खुलासा केला नव्हता. पक्षाच्या एका नेत्याने राहुल गांधी उत्तराखंडमध्ये असल्याचे सांगितले. मात्र, पक्षाकडून त्याचा इन्कार करण्यात आला.
लोकसभा निवडणुकीपासून सातत्याने पराभवाला सामोरे जात असलेल्या कॉंग्रेस पक्षाला दिल्ली विधानसभा निवडणुकीत आपले खातेही उघडता आले नव्हते. या पार्श्वभूमीवर चिंतनासाठी राहुल गांधी अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पूर्वार्धात अनुपस्थित राहणार असल्याची माहिती कॉंग्रेसमधील सूत्रांकडून मिळाली होती. पण राहुल गांधी यांनी नेमक्या कोणत्या कारणासाठी सुटी घेतली आहे. याचाही माहिती पक्षाने दिली नाही.
येत्या पाच दिवसांत म्हणजेच पुढच्या आठवड्यात राहुल गांधी दिल्लीत परततील, अशी माहिती कमलनाथ यांनी एका कार्यक्रमामध्ये पत्रकारांना दिली. कळमेश्वर येथील इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट टेक्नॉलॉजीच्या पदवीप्रदान समारंभानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली. पुढील आर्थिक वर्षाचा रेल्वे आणि सर्वसाधारण अर्थसंकल्प लोकसभेत सादर केला जात असताना, राहुल गांधी यांनी सुटी घेतल्यामुळे त्यांच्यावर टीका करण्यात आली होती.