काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्या विरोधात भाजपने मोहीम चालवली आहे. भाजपच्या आरोपांना उत्तर देण्यासाठी राहुल यांनी समाजमाध्यमांत सक्रिय व्हावे, असा सल्ला काँग्रेस सरचिटणीस दिग्विजय सिंह यांनी दिला आहे.
राहुल यांची कोंडी करण्यासाठी भाजपने व्यावसायिक मंडळींना हाताशी धरल्याचा आरोपही त्यांनी केला. राहुल यांच्या क्षमतेबाबत काही काँग्रेस नेत्यांशी शंका घेतल्याचे वृत्त दिग्विजय सिंह यांनी फेटाळून लावले. सोनिया गांधी यांच्याकडे पक्षाची धुरा आहे. त्यांनी तसेच काँग्रेस नेत्यांनी राहुल यांची अध्यक्षपदी निवड करण्याचा निर्णय घेतल्यास सर्व नेते स्वीकारतील, असे दिग्विजय सिंग यांनी सांगितले. राहुल गांधी ५६ दिवस सुटीवर गेले असताना भाजपने त्यांच्या विरोधात मोहीमच उघडली होती, असा आरोप दिग्विजय यांनी केला. राहुल गांधी विशेष संरक्षण असल्याने ते कोठे होते याची माहिती पंतप्रधान व केंद्रीय गृहमंत्र्यांना असणार, तरीही भाजपने अपप्रचार कसा केला, असा सवाल त्यांनी विचारला.