काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांना शेतीविषयक समस्यांबाबतची वस्तुस्थिती खरेच जाणून घ्यायची असेल, तर त्यांनी काँग्रेसशासित राज्यांचा दौरा करावा, असे आव्हान केंद्रीय वाणिज्य राज्यमंत्री निर्मला सीतारामन यांनी त्यांना दिले आहे.
राहुल गांधी हे गैरकाँग्रेसशासित राज्यांमध्ये जाऊन तेथील शेतकऱ्यांशी संवाद साधत आहेत. त्यांनी काँग्रेसचे शासन असलेल्या राज्यांमध्ये जावे असे माझे त्यांना आव्हान आहे. विशेषत: गेल्या काही महिन्यात शेतकऱ्यांनी मोठय़ा संख्येत आत्महत्या केलेल्या कर्नाटकचा त्यांनी दौरा करावा, असे सीतारामन शनिवारी पत्रकारांशी बोलताना म्हणाल्या.
तामिळनाडू तसेच आंध्र प्रदेशातील अनंतपूर येथील राहुल गांधी यांच्या भेटींचा उल्लेख करून सीतारामन म्हणाल्या, की त्यांनी किमान महाराष्ट्रात जायला हवे होते, ज्या ठिकाणी यापूर्वीच्या काँग्रेसच्या राज्यात सर्वाधिक संख्येत शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. या मृत्यूंबाबत त्यांनी काय उपाय सुचवला हे राहुल यांनी सांगावे, असे आवाहन त्यांनी केले.
राहुल गांधी हे ज्या ठामपणे भूसंपादन विधेयकाला विरोध करत आहेत, त्यावरून ते सरकारला जमिनीच्या एका तुकडय़ाचेही अधिग्रहण करू देणार नाहीत असे वाटते. याचाच अर्थ ते विकासाच्या विरोधात असल्याचे दिसते, असे मंत्री म्हणाल्या. राहुल यांच्या विरोधामुळे ओदिशातील ‘पॉस्को’ प्रकल्पाने माघार घेतल्याबद्दल निर्मला यांनी त्यांना दोष दिला. पूल, रस्ते व इतर पायाभूत सोयी उभारण्यासाठीच जमिनीचे अधिग्रहण करण्यात येत असल्याचे त्या म्हणाल्या.