कोणत्याही नव्या गाड्यांची घोषणा न करता पायाभूत सुविधांच्या विकासावर भर देणारा रेल्वे अर्थसंकल्प रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी गुरूवारी लोकसभेत मांडल्यानंतर त्यावर विरोधकांच्या नाराजीच्या प्रतिक्रिया उमटताना दिसत आहेत. रेल्वेमंत्र्यांनी केवळ जुन्याच गोष्टी नव्याने रेटल्याची प्रतिक्रिया काँग्रेसचे माजी रेल्वेमंत्री पवनकुमार बन्सल यांनी दिली. गेल्या काही महिन्यांमध्ये डिझेलचे दर घटले आहेत, तरीही सुरेश प्रभूंनी रेल्वेचे प्रवासी भाडे कमी केलेले नाही हा अन्याय असल्याचे पवनकुमार बन्सल म्हणाले. तसेच मागील वर्षी ज्या घोषणा केल्या त्याबद्दल सुरेश प्रभूंनी काहीच माहिती दिलेली नाही. मागील घोषणांची पन्नास टक्के अंमलबजावणीसुद्धा झालेली नसल्याने मागच्या घोषणांकडे पाठ आणि पुढचे सपाट असा यंदाचा रेल्वे अर्थसंकल्प असल्याची टीका बसप अध्यक्ष मायावती यांनी केली.
सुरेश प्रभूंनी सादर केलेला रेल्वे अर्थसंकल्प पूर्णपणे पीपीपी आणि बिओटी तत्त्वार आधारलेला असल्याने त्याबाबत कोणत्याही प्रकारची शाश्वती नाही. कोणत्याही नव्या गाड्यांची घोषणा न करता रेल्वेमंत्री मुंबईचे असल्याने केवळ मुंबई-अहमदाबाद कनेक्शन सांगणारा हा अर्थसंकल्प होता, अशी प्रतिक्रिया माजी रेल्वमंत्री मल्लिकार्जुन खर्गे यांनी दिली.