रेल्वे अर्थसंकल्प भविष्याचा वेध घेणारा आणि प्रवाशांच्या हिताचा असून, देशाच्या आर्थिक वाढीत रेल्वे महत्त्वाची भूमिका कशा रीतीने बजावेल याचा सुस्पष्ट आराखडा त्यात दर्शवलेला असल्याचे सांगून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रेल्वे अर्थसंकल्पाची प्रशंसा केली.
हा अर्थसंकल्प म्हणजे दूरदृष्टी आणि लक्ष्य साध्य करण्यासाठी निश्चित योजना यांचा संगम आहे. केवळ रेल्वेचे डबे आणि गाडय़ा यांची चर्चा न करता रेल्वेत सर्वसमावेशक सुधारणा घडवण्याचे प्रयत्न यातून होणार आहेत. रेल्वेतील तंत्रज्ञानाचा दर्जा वाढवणे आणि तिचे आधुनिकीकरण करणे यासाठी पहिल्यांदाच अशी ठोस दूरदृष्टी दाखवण्यात आल्याचा मला विशेष आनंद आहे, असे मोदी यांनी ट्विटरवर म्हटले आहे. सामान्य माणसाचा केलेला विचार, वेगवाढ, सेवा आणि प्रवाशांची सुरक्षितता या सर्वाचा एकत्रित विचार हे अर्थसंकल्पाचे वैशिष्टय़ असल्याचे त्यांनी नमूद केले.
पर्यावरण आणि वनमंत्री प्रकाश जावडेकर यांनी अर्थसंकल्पाचे वर्णन ‘ऐतिहासिक आणि कल्पक’ असे केले. हा खऱ्या अर्थाने क्रांतिकारक अर्थसंकल्प आहे. रेल्वेला लोकाभिमुख उद्योग बनवण्याच्या पंतप्रधानांच्या दृष्टीचे यात प्रतिबिंब पडले आहे. यातून अधिक सुरक्षितता व अधिक सोयींची निश्चिती होणार असून, अभिनव तंत्रज्ञानातून संसाधनांच्या कमतरतेचा प्रश्नही सोडवला जाईल. अर्थसंकल्पात प्रक्रियांबाबत पारदर्शकता आहे. रेल्वेने पर्यावरण संरक्षणावर अधिक भर दिला, हे प्रथमच घडले आहे. पर्यावरण संचालनालयाची निर्मिती, बायो-टॉयलेट, ऊर्जा अंकेक्षण, पाणी व ऊर्जेचा पुनर्वापर आणि वन्यजीवांबाबत संवेदनशीलता यासारखे उपक्रम प्रशंसनीय असल्याचे ते म्हणाले.
अर्थसंकल्पाच्या तत्त्वज्ञानात पंतप्रधानांच्या दूरदृष्टीचे प्रतिबिंब दिसत असून, प्रवाशांच्या गरजा भागवण्याचाही विचार करण्यात आला असल्याचे अकाली दलाचे खासदार प्रेमसिंग चंदुमाजरा म्हणाले. तर गेल्या २० ते २५ वर्षांतील हा सर्वोत्तम अर्थसंकल्प असल्याचे मत माजी नोकरशहा व ‘लोकसत्ता’ पक्षाचे संस्थापक जयप्रकाश नारायण यांनी व्यक्त केले. केवळ नव्या गाडय़ा व शेकडो प्रकल्प जाहीर करण्याच्या परंपरागत राजकीय प्रथेच्या विपरीत, दीर्घकालीन धोरण आखून तो तयार करण्यात आल्याची प्रशंसा त्यांनी केली.