आठवडाभरात लागोपाठ दोन रेल्वे अपघात झाल्यानंतर रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष ए के मित्तल यांनी बुधवारी राजीनामा दिला आहे. रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी अद्याप मित्तल यांचा राजीनामा मंजूर केला नसल्याचे वृत्त आहे. रेल्वे अपघातांचे सत्र सुरुच असल्याने रेल्वे मंत्रालयावर गेल्या काही दिवसांपासून टीका होत आहे.

गेल्या सात दिवसांत उत्तर प्रदेशमध्ये दोन रेल्वे अपघात झाले आहेत. बुधवारी पहाटे औरेया जिल्ह्यात कैफियत एक्स्प्रेस रुळावरुन घसरली. ७० हून अधिक प्रवासी या अपघातात जखमी झाले. त्यापूर्वी मुजफ्फरनगरमध्ये खतौली येथे उत्कल एक्स्प्रेस रुळावरुन घसरली होती. या अपघातात २० हून अधिक प्रवाशांचा मृत्यू झाला. तर ४० प्रवासी जखमी झाले. खतौलीत झालेल्या अपघातानंतर रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्या अडचणी वाढल्या होत्या. सुरेश प्रभू यांनी तात्काळ राजीनामा द्यावा अशी मागणी विरोधकांनी केली होती. रेल्वे मंत्रालयावरील दबाव वाढत असतानाच कैफियत एक्स्प्रेसचा अपघात झाला. या दोन अपघातांच्या पार्श्वभूमीवर बुधवारी दुपारी रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष ए के मित्तल यांनी पदाचा राजीनामा दिला.

ए के मित्तल यांना मोदी सरकारने दोन वर्षांसाठी मुदतवाढ दिली होती. २०१६ मध्येच मित्तल निवृत्त होणार होते. मात्र रेल्वे मंत्रालयाने मित्तल यांना दोन वर्षांसाठी मुदतवाढ द्यावी अशी शिफारस केली होती. पंतप्रधान कार्यालयानेही मित्तल यांना मुदतवाढ देण्यास हिरवा कंदील दाखवला होता. मात्र गेल्या दोन वर्षात रेल्वे अपघातांचे प्रमाण वाढले असून शेकडो प्रवाशांना जीव गमवावा लागला आहे. त्यामुळे रेल्वेमंत्री सुरेश प्रभू आणि रेल्वे मंत्रालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांवर टीका होत आहे. उत्कल एक्स्प्रेसच्या अपघातानंतर सुरेश प्रभू यांनी तीन वरिष्ठ अधिकाऱ्यांना सक्तीच्या रजेवर पाठवले होते.