रेल्वे अर्थसंकल्पात भाववाढ नाही, महसूलवाढही नाही!
मुंबई आणि महाराष्ट्राची उपेक्षाच

Untitled-13
प्रवासी वा मालवाहतुकीतील दरवाढ टाळून आणि खर्चकपात व खासगी गुंतवणुकीचे इंजिन जोडून रेल्वेचे जाळे आणि क्षमता वाढविण्याची हमी देणारा रेल्वे अर्थसंकल्प रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी गुरुवारी लोकसभेत सादर केला. २०१७ या वित्तीय वर्षांत भागीदारीत ९२ हजार ७१४ कोटी रुपयांचे ४४ नवे प्रकल्प उभारण्याचा संकल्प प्रभू यांनी सोडला असला तरी आधीच वित्तीय कोंडीत सापडलेली आणि माथ्यावर सातव्या वेतन आयोगाची टांगती तलवार असलेली रेल्वे महसूल नेमका किती आणि कसा गोळा करणार, याचे कोणतेही ठोस दिशादर्शन या अर्थसंकल्पात नाही. त्यामुळे प्रवाशांसाठी दयाळू असलेला हा अर्थसंकल्प अर्थक्षमतेच्या बाबतीत मात्र दीनहीनच ठरला आहे.
तीन नव्या सुपरफास्ट गाडय़ा आणि मालवाहतुकीचे तीन स्वतंत्र नवे रेल्वेमार्ग २०१९ पर्यंत प्रत्यक्षात येतील, अशी ग्वाहीही अर्थसंकल्पात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आग्रही कल्पनेतून पुढे आलेल्या अहमदाबाद-मुंबई बुलेट ट्रेनचेही सूतोवाच आहे. त्यासाठी अहमदाबाद-मुंबई अतिवेगवान प्रवासी पट्टा तयार केला जाईल आणि जपानच्या साह्य़ाने तो प्रत्यक्षात येईल, अशी ग्वाहीही प्रभू यांनी दिली. यामुळे रेल्वेला अत्याधुनिक तंत्रज्ञान आत्मसात करता येईल, असा जोडलाभ प्रभू यांनी नमूद केला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा लोकसभा मतदारसंघ असलेल्या वाराणसीला नवी दिल्लीशी जोडणाऱ्या नव्या अद्ययावत रेल्वेगाडीची घोषणाही प्रभू यांनी केली. याचबरोबर गुजरातमधील बडोदा येथे राष्ट्रीय रेल्वे विद्यापीठ स्थापण्याची घोषणाही प्रभू यांनी केली.
मुंबईच्या सध्याच्या उपनगरी सेवेतील गोंधळातून सुटका करणारे कोणतेही उपाय या अर्थसंकल्पात नसले तरी सीएसटी-पनवेल आणि चर्चगेट-विरार उन्नत मार्गाचे गाजर दाखवले गेले आहे. फलाटांची उंची वाढविण्याचे सूतोवाचही त्यात आहे. महाराष्ट्रासाठी अन्य कोणतीही घोषणा नाही.
ई-टिकेटिंगद्वारे मिनिटाला ७२०० तिकिटे देण्याची क्षमता, ई-केटरिंग, बारकोड तिकिटे, विश्रामकक्षांची ऑनलाइन नोंदणी, मोबाइलवरून तिकीट काढणे वा रद्द करता येणे, वायफायची १०० स्थानकांवर सोय, ३०० स्थानकांवर सीसीटीव्ही बसविणे आदी घोषणांनी रेल्वेच्या आधुनिकतेची नांदी प्रभू यांनी केली आहे. ईशान्य भारताशी रेल्वेसंपर्क वाढविणे, विद्युतीकरण, ज्येष्ठ नागरिक आणि महिलांसाठी लांब पल्ल्याच्या गाडय़ांत कोटा वाढविणे, लहान मुलासह प्रवास करणाऱ्या महिलांना गरम पाणी, दूध आणि पौष्टिक आहार देणे; आदी घोषणाही अर्थसंकल्पात आहेत. ‘हमसफर’ ही त्रिस्तरीय शयनकक्ष असलेली संपूर्ण वातानुकूलित गाडी, ‘तेजस’ ही ताशी १३० किमीचा पल्ला गाठणारी आणि सर्व अद्ययावत सोयीसुविधा असलेली गाडी, दोन महानगरांना जोडणाऱ्या आणि रात्रीच्या वेळेत धावणाऱ्या ‘उदय’ आणि ‘उत्कृष्ट’ या गाडय़ा, ‘अंत्योदय’ आणि ‘दीन दयालु’ या दोन अतिवेगवान आणि पूर्णत: अनारक्षित तिकीटधारकांसाठीच्या गाडय़ा; अशा आकर्षक गाडय़ांची घोषणाही प्रभू यांनी केली आहे. रेल्वे हमालांचे ‘कुली’ऐवजी ‘सहायक’ असे नामांतरही प्रभू यांनी केले आहे.

Untitled-12

Untitled-14

Untitled-15