महत्त्वाकांक्षी १.२१ लाख कोटी रुपयांच्या भांडवली खर्चाचे रेल्वे अर्थसंकल्पाने आखलेले नियोजन पाहता, निधी उभारण्याचे नवनवीन मार्ग चोखाळणे रेल्वेला यंदा क्रमप्राप्त ठरले आहे. विद्यमान आर्थिक वर्षांच्या तुलनेत ७६ टक्के अधिक म्हणजे सुमारे २०,००० कोटी रुपये २०१६-१७ सालात खुल्या बाजारातून उभारण्याचे लक्ष्य रेल्वेने निर्धारित केले आहे. भारतीय रेल्वे वित्त महामंडळ (आयआरएफसी) आणि रेल विकास निगम लि. या रेल्वेच्या उपकंपन्यांमार्फत हा निधी उभारला जाणार आहे. विदेशातून रोख्यांची विक्री करून निधी उभारण्याचा प्रयोगही रेल्वे पहिल्यांदाच अजमावणार आहे.
चालू आर्थिक वर्षांत रेल्वेने १७,६५५ कोटी रुपये खुल्या बाजारातून उभारण्याचे निर्धारित केले होते, परंतु रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी गुरुवारी संसदेत रेल्वे अर्थसंकल्प मांडताना, ते सुधारून ११,८४८ कोटी रुपये असे खाली आणले. यापैकी आयआरएफसीने ११,५९१.६६ कोटी रुपये, तर रेल विकास निगमने २५५.९० कोटी रुपयांची रोखे विक्रीद्वारे उभारणी पूर्णही केली आहे.
तथापि, आर्थिक वर्ष २०१६-१७ मध्ये आयआरएफसीला १९,७६० कोटी रुपये उभारण्याचे आणि रेल विकास निगमला २४० कोटी रुपये उभारण्याचे उद्दिष्ट सोपविण्यात आले आहे.
विविध भागीदाऱ्यांतून १८,३४० कोटी अपेक्षित
विविध भागीदार मिळवून आणि राज्यांबरोबर सामंजस्य करार या माध्यमातून रेल्वेला १८,३४० कोटी रुपयांचा महसुली स्रोत उपलब्ध होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.