पायाभूत सुविधांच्या विकासावर भर देणारा त्याचबरोबर रेल्वेप्रवास अधिक सुखद करण्यासाठी विविध सुविधा उपलब्ध करून देणारा पुढील आर्थिक वर्षासाठीचा रेल्वे अर्थसंकल्प रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी गुरुवारी लोकसभेत मांडला. या अर्थसंकल्पात प्रवासी भाड्यामध्ये कोणतीही वाढ करण्यात आलेली नसून, कोणत्याही मार्गावर नव्याने रेल्वेगाडीची घोषणाही करण्यात आलेली नाही. संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनातच नव्या गाड्यांची घोषणा करू, असे आश्वासन प्रभू यांनी दिले.
सुमारे सव्वातासाच्या भाषणामध्ये प्रभू यांनी रेल्वेच्या पुनर्जन्माचे आश्वासन देतानाच आपला सर्व भर प्रवाशांना अधिकाधिक सुविधा उपलब्ध करून देण्यावर असल्याचे स्पष्ट केले. स्वच्छता, तिकिटांची उपलब्धता, रेल्वेगाड्यांचा वेग, रेल्वे डब्यांची रचना, स्थानकांवरील सुविधा, अपघात टाळणे, व्यवस्थापन या सर्व स्तरांवर आमुलाग्र बदल करण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. रेल्वेच्या विकासासाठी चार उद्दिष्टे निश्चित करण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामध्ये प्रवाशांच्या अनुभवांचे मापन, सुरक्षितता, पायाभूत सुविधांचा विकास, आर्थिकदृष्ट्या तंदुरुस्ती याचा समावेश आहे. या उद्दिष्टांच्या पूर्ततेसाठी त्यांनी ११ कलमी कार्यक्रमही आखला आहे. याच कार्यक्रमाच्या आधारे पुढील काळात रेल्वे विकास साध्य केला जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
रेल्वेच्या सद्यस्थितीवर आधारित श्वेतपत्रिकाही प्रभू यांनी गुरुवारी लोकसभेत सादर केली. रेल्वेच्या नियोजित खर्चामध्ये दुपटीने वाढ करण्याचे लक्ष्य त्यांनी ठेवले आहे. त्यानुसार रेल्वे अर्थसंकल्पात तरतूदही करण्यात आली आहे.
अहमदाबाद-मुंबई या मार्गावरील बुलेट ट्रेनसाठी सर्वेक्षणाचे काम अंतिम टप्प्यात आले असून, येत्या काळात दिल्ली-मुंबईसह एकूण नऊ मार्गांवर बुलेट ट्रेन सुरू करण्याचा प्रस्ताव असल्याचेही प्रभू यांनी सांगितले. केंद्र सरकारच्या स्वच्छ भारत कार्यक्रमावर आधारित रेल्वेमध्ये ‘स्वच्छ रेल, स्वच्छ भारत’ कार्यक्रम आखण्यात आला असून त्याअंतर्गत रेल्वेमधील आणि स्थानकांवरील स्वच्छतेकडे अधिक लक्ष देण्यात येणार आहे. यासाठी रेल्वेमध्ये नवीन विभागच सुरू करण्यात येणार असल्याचे प्रभू यांनी सांगितले.
रेल्वेमधून प्रवास करणाऱयांना तिकीट काढताना कोणताही त्रास सहन करावा लागू नये, यासाठीही त्यांनी काही नव्या सुविधांची घोषणा केली आहे. त्यामध्ये आता कोणत्याही गाडीचे आरक्षण चार महिने अगोदर करता येईल. पूर्वी तीन महिने अगोदर आरक्षण करता येत होते. पाच मिनिटांत तिकीट ही नवी सुविधा सुरू करण्यात येणार असून, त्यामाध्यमातून प्रवाशांना विनाआरक्षित तिकीट मशिनच्या माध्यमातून पुरविण्यात येणार आहे.