संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन येत्या २१ फेब्रुवारीला सुरू होणार आहे. केंद्रीय रेल्वेमंत्री पवनकुमार बन्सल २६ फेब्रुवारीला रेल्वे अर्थसंकल्प लोकसभेत सादर करतील आणि २८ फेब्रुवारीला अर्थमंत्री पी. चिदंबरम सर्वसाधारण अर्थसंकल्प सादर करतील.
गेल्या महिन्यात सर्व प्रकारच्या रेल्वेच्या भाड्यामध्ये वाढ करण्यात आली आहे. त्यावेळी बन्सल यांनी आगामी अर्थसंकल्पात कोणतीही भाडेवाढ करणार नसल्याचे स्पष्ट केले होते. त्यामुळे रेल्वे अर्थसंकल्पात प्रवाशांवर कोणताही नवा आर्थिक बोजा न पडण्याची शक्यता आहे. अडचणीत सापडलेल्या अर्थव्यवस्थेला बाहेर काढण्यासाठी चिदंबरम कोणत्या उपाययोजना करतात, याकडेही सर्वांचे लक्ष लागणार आहे. गेल्यावर्षी तत्कालिन अर्थमंत्री प्रणव मुखर्जी यांनी केंद्रीय अर्थसंकल्प मांडला होता. मात्र, मुखर्जी राष्ट्रपती झाल्यानंतर अर्थखाते चिदंबरम यांच्याकडे आले त्यामुळे यूपीए २ सरकार सत्तेवर आल्यानंतरचा चिदंबरम यांचा हा पहिलाच अर्थसंकल्प आहे.