रेल्वेत काम करणाऱ्या एका मध्यमवयीन महिलेवर तिच्या चार सह कर्मचाऱ्यांनी काही दिवस सामूहिक बलात्कार करून या घटनेची वाच्यता केल्यास तिची छायाचित्रे इंटरनेटवर अपलोड करण्याची धमकी दिली.
डमडम येथील पोलीस अधिकारी अपूर्व चक्रवर्ती यांनी सांगितले की, आम्हाला याबाबत तक्रार मिळाली आहे. त्या संदर्भात चौकशी सुरू केली असून चार आरोपींना शोधण्याचे काम चालू आहे पण ते फरारी आहेत. सदर महिला विवाहित असून तिने हा सगळा प्रसंग एका दूरचित्रवाणी वाहिनीवर सांगितला.
चितपूर यार्ड येथे या चौघांनी आपल्यावर अनेक दिवस सामूहिक बलात्कार केला, या घटनेची वाच्यता केल्यास छायाचित्रे इंटरनेटवर टाकण्याची तसेच वेळप्रसंगी ठार मारण्याची धमकीही त्यांनी आपल्याला दिली होती, असा आरोप तिने केला. डमडम पोलिसात तक्रार दिल्याचे सांगून ती म्हणाली की, आपला पती ज्ञानेश्वरी रेल्वे अपघातात वारल्यानंतर २०१० मध्ये आपल्याला रेल्वेत नोकरी मिळाली. नंतर आपण पुनर्विवाह केला. बलात्कार करणाऱ्यांनी आपल्याला पतीपासून घटस्फोट घेण्यास सांगितले. आपण गर्भवती राहिल्यानंतरही त्यांचा हा प्रकार चालू होता, त्यामुळे पतीला हे सांगितल्यानंतर त्याने आत्महत्येचा प्रयत्न केला. पण आपण त्याला रुग्णालयात नेऊन त्याचे प्राण वाचवले. राज्य महिला कल्याण विभागाने डमडम पोलिसांकडून अहवाल मागवला आहे. राज्याच्या महिला कल्याण मंत्री शशी पांजा यांनी सांगितले, आपण पोलिसांना या प्रकरणात चौकशी करून अहवाल सादर करण्यास सांगितले आहे.