रेल्वे अपघातांची नैतिक जबाबदारी स्वीकारत रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे राजीनामा सोपवला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अद्याप प्रभू यांचा राजीनामा स्वीकारलेला नाही. मोदींनी प्रभूंचा राजीनामा ‘वेटिंग’वर ठेवल्याचे सूत्रांनी सांगितले.

आठवडाभरात लागोपाठ दोन रेल्वे अपघात झाल्यानंतर रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्यावर टीका होत होती. बुधवारी पहाटे उत्तर प्रदेशातील औरेया जिल्ह्यात कैफियत एक्स्प्रेस रुळावरुन घसरली. एक्स्प्रेसने डंपरला धडक दिली आणि यानंतर एक्स्प्रेसचे १० डबे रुळावरुन घसरले. या अपघातात ७० प्रवासी जखमी झाले. गेल्या आठवड्यात शनिवारी उत्तर प्रदेशमध्येच मुजफ्फरनगरमध्ये उत्कल एक्स्प्रेसला अपघात झाला होता. उत्कल एक्स्प्रेसचे डबेही रुळावरुन घसरले आणि यात सुमारे २३ प्रवाशांचा मृत्यू झाला होता. चार दिवसांत दोन रेल्वे अपघात झाल्यानंतर सुरेश प्रभू यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी जोर धरत होती.

बुधवारी दुपारी रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली. सुरेश प्रभू यांनी रेल्वे अपघातांची जबाबदारी स्वीकारत मोदींकडे राजीनामा सोपवला. मात्र मोदींनी प्रभूंचा राजीनामा स्वीकारलेला नाही. राजीनामा दिल्यावर मोदींनी मला थांबा असे सांगितल्याचे सुरेश प्रभूंनी स्पष्ट केले.

सुरेश प्रभूंनी ट्विटरवरुन याविषयी माहिती दिली. प्रभू म्हणतात, गेल्या तीन वर्षांपासून मी रेल्वेच्या विकासासाठी अथक परिश्रम घेतले. रेल्वे सुधारण्यासाठी माझं रक्त आणि घाम गाळला. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली गेल्या दोन दशकांपासून कायम असलेल्या रेल्वे खात्यातील समस्या सोडवण्याचा प्रयत्न केला. रेल्वेत गुंतवणूक आणण्याचा प्रयत्नही केला असा दावा त्यांनी केला. मात्र रेल्वे अपघातात झालेल्या जीवितहानीमुळे मी व्यथित झालो. यामुळेच मी मोदींकडे राजीनामा सोपवला असे प्रभूंनी सांगितले.