भारतीय रेल्वेपुढे अस्तित्वाचा पेच आहे. कारण रस्ते क्षेत्राकडे लक्ष देताना रेल्वेकडे दुर्लक्ष झाले असे असले तरी आर्थिक स्थिती वाईट असतानाही आम्ही ओएनजीसी (तेल व नैसर्गिक वायू महामंडळ) प्रमाणे रेल्वेला शेअर बाजारात उतरवणार नाही, असे रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी सांगितले.
रेल्वेची वाहतूक रस्त्यांमुळे गमावली आहे. सरकारने रेल्वेच्या चार ते पाच पट गुंतवणूक रस्त्यांमध्ये केली आहे, रेल्वेकडे पद्धतशीर दुर्लक्ष करण्यात आले व आता रेल्वेच्या अस्तित्वाचा पेच आहे. वाहतूक रस्त्यांकडून रेल्वेकडे वळवायची असेल, तर मोठी गुंतवणूक लागेल असे सांगून प्रभू म्हणाले, की वस्तूंची मोफत वाहतूक करण्याचीसुद्धा क्षमता रेल्वेत उरलेली नाही. ताज्या कॅग अहवालानुसार भारतीय रेल्वे कोच सेवा व इतर सेवांमध्ये खर्च भागवू शकत नसल्याने २०११-१२ मध्ये २३६४३ कोटी रुपयांचा तोटा झाला आहे.
रेल्वेची स्थिती सुधारण्यावर उपाय विचारले असता त्यांनी सांगितले, की ओएनजीसीप्रमाणे निधी जमवण्याकरिता रेल्वेचीही नोंदणी शेअरबाजारात करायला हवी पण रेल्वेची वेगळी वैशिष्टय़े असल्याने तसे करणे व्यवहार्य ठरणार नाही. रेल्वे हे मंत्रालय आहे तर ओएनजीसी ही कंपनी आहे. या फरकामुळे तसे करता येत नाही. रेल्वेत काही व्यावसायिक हित आहे, सामाजिक जबाबदारी आहे त्यामुळे अर्थसंकल्पीय निधीवर अवलंबून राहावे लागते.