ईशान्य भारतातील बहुतांश राज्यांच्या राजधानीची शहरे २०२० सालापर्यंत रेल्वे मार्गाने जोडली जातील, असे भारतीय रेल्वेने म्हटले आहे.
सिक्कीमसह ईशान्य भारतातील राजधानीची शहरे २०२० पर्यंत रेल्वेच्या नकाशावर येतील. त्यासाठी रेल्वेने ‘मिशन २०२०’ सुरू केले असून ठरलेल्या कालमर्यादेत त्याची अतिशय काटेकोरपणे अंमलबजावणी केली जाईल, असे नॉर्थईस्ट फ्रंटियर रेल्वेचे महाव्यवस्थापक (बांधकाम) राजेशकुमार सिंग यांनी सांगितले.
आगरतळा येथे गेज रुंदीकरणाचे काम मार्च २०१६ पर्यंत पूर्ण होईल. त्यापुढील वर्षांत, म्हणजे मार्च २०१७ पर्यंत मणिपूरमधील तुपुल रेल्वेने जोडले जाईल. मार्च २०१८ पूर्वी मिझोरामची राजधानी असलेल्या ऐझॉलजवळील सैरांगपर्यंत ब्रॉडगेज मार्ग सुरू होईल. तुपुलपासून इंफाळपर्यंत नवा रेल्वे मार्ग टाकण्याचे काम मार्च २०१९ पर्यंत पूर्ण होईल,  तर ३१ मार्च २०२० पर्यंत मेघालयमधील शिलाँग आणि सिक्कीममधील रँगपोपर्यंत रेल्वे मार्ग टाकले जातील, अशी माहिती सिंग यांनी दिली.