रेल्वे प्रवासात अनेकदा खाद्य पदार्थांचा दर्जा आणि त्यासाठी आकारण्यात येणारी अधिक रक्कम यामुळे प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागतो. मात्र यावर रेल्वे प्रशासनाने चांगला उपाय शोधून काढला आहे. रेल्वे गाड्यांमध्ये एटीएम मशीनच्या धर्तीवर मशीन लावण्यात येणार आहेत. या मशीनमधून रोख रक्कम किंवा कार्डच्या माध्यमातून प्रवासी खाद्य पदार्थ घेऊ शकणार आहेत. त्यामुळे प्रवाशांना खाद्य पदार्थ मागवण्यासाठी रेल्वे कर्मचाऱ्यांची वाट पाहावी लागणार नाही. रेल्वे कर्मचाऱ्यांकडून अनेकदा अवाजवी किमतीला खाद्यपदार्थ विकले जातात. एटीएम मशीनच्या धर्तीवर फूड मशीन लावण्यात येणार असल्याने प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.

सर्वप्रथम फूड मशीन उदय ट्रेनमध्ये लावण्यात येणार आहेत. ऑक्टोबर महिन्यापासून उदय ट्रेन धावणार आहे. ‘डबल डेकर उदय ट्रेनमध्ये दर तीन डब्ब्यानंतरच्या एका डब्यात १६ आसने कमी करण्यात आली आहेत. या ठिकाणी अशा फूड मशीन लावण्यात येणार आहेत, ज्यामध्ये प्रवाशांना तयार जेवण मिळेल. जेवणासोबतच इतरदेखील खाद्य पदार्थ फूड मशीनमध्ये उपलब्ध असणार आहेत. ही मशीन स्वयंचलित असणार आहे. मशीनच्या स्क्रिनवर उपलब्ध खाद्य पदार्थांची यादी आणि त्यांचे दर देण्यात येणार आहेत,’ अशी माहिती रेल्वेतील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली आहे.

फूड मशीनमधील खाद्य पदार्थ विकत घेण्यासाठी प्रवाशांना रोख रक्कम किंवा डेबिट कार्ड/क्रेडिट कार्डचा वापर करता येईल. शाकाहारी आणि मांसाहारी असे दोन्ही पर्याय खाद्य पदार्थांमध्ये उपलब्ध असणार आहेत. खाद्य पदार्थ गरम केल्यावरच ते प्रवाशांना देण्याची सोय फूड मशीनमध्ये असेल. त्यामुळे या मशीनसाठी कोणत्याही कर्मचाऱ्याची आवश्यकता भासणार नाही.

उदय या डबल डेकर ट्रेनचा संपूर्ण प्रवास रात्रभरात होणार आहे. रात्री एका स्थानकातून सुटलेली उदय ट्रेन दुसऱ्या दिवशी सकाळी शेवटच्या स्थानकावर पोहोचणार आहे. त्यामुळे ट्रेनमध्ये जेवणारे विद्यार्थी अतिशय सहजपणे या फूड मशीनच्या माध्यमातून जेवण घेऊ शकतात. फूड मशीनमधून येणारे अन्न पूर्णपणे हवाबंद स्वरुपात प्रवाशांना मिळणार आहेत. यासोबतच या खाद्य पदार्थांच्या दर्जासाठी खाद्य पदार्थांचा पुरवठा करणारी कंपनी सर्वस्वी जबाबदार असणार आहे.