तब्बल एक महिना उशिराने आलेल्या वरुणराजाने देशभरात चांगलाच जोर पकडला असून काही निवडक भाग वगळता देशातील पावसाची स्थिती सुधारत चालल्याचेच चित्र आहे. मान्सूनच्या उशिराने झालेल्या आगमनामुळे निर्माण झालेली सरासरी पावसातील तूटही कमी कमी होत चालली असून आता हा आकडा ३१ टक्क्यांवर आला आहे, अशी माहिती हवामान खात्याने दिली.
यंदा मान्सूनने बळीराजासह जनतेच्या डोळ्यात पाणी आणले. संपूर्ण जून महिना पावसाने दडी मारल्यामुळे पहिल्या दीड महिन्यातील पावसाची सरासरी प्रचंड कमी भरली. जून महिन्यातील पावसाच्या तुटीचा हा आकडा ४३ टक्क्यांवर गेला. मात्र जुलै महिन्याच्या १३ तारखेनंतर पावसाने चांगलाच जोर पकडला आणि देशभरात सर्वत्रच बळीराजाने सुटकेचा नि:श्वास टाकला. १७ जुलैपर्यंत पावसाने संपूर्ण देशात हजेरी लावली. जुलै महिन्यातील या मुसळधार पावसामुळे सरासरी पावसाचा आकडा १२ टक्क्यांनी भरून निघाला असून अजूनही सरासरीपेक्षा ३१ टक्के पाऊस कमी आहे, अशी माहिती भारतीय हवामान खात्याचे महासंचालक लक्ष्मण सिंग राठोड यांनी दिली.
जोर पुन्हा वाढणार
मुंबई : मुंबई वगळता ठाणे, रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग या परिसरात काही ठिकाणी अतिमुसळधार पावसाचा इशारा वेधशाळेने दिला आहे. या पावसाचा जोर मध्य महाराष्ट्रातही दिसेल. सोमवार आणि मंगळवारी कोकणासह मध्य महाराष्ट्रात सर्वत्र पावसाच्या सरी येतील. या पावसाचा प्रभाव रविवारीही दिसत होता. अरबी समुद्रातील कमी दाबाच्या पट्टय़ामुळे एकीकडे राज्याच्या पश्चिम भागातील पावसाचा तुटवडा काही प्रमाणात भरून निघत असतानाच बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या पट्टय़ामुळे विदर्भातही पावसाच्या सरी सुरू राहणार आहेत. येत्या दोन दिवसांत विदर्भातील मध्यम स्वरूपाचा पाऊस कायम राहणार असल्याचे मुंबई हवामानशास्त्र विभागातील अधिकाऱ्यांनी सांगितले.