गुजरात, राजस्थानसह पश्चिम बंगालमधील पूरग्रस्त भागात लष्कराला मदतकार्यासाठी पाचारण करण्यात आले असून, रेल्वेचे रूळ पूर्ववत करणे, बुडणारी आई व तिच्या बाळाला तसेच एका कुत्र्याला वाचवणे यासारखी कामे भूदल व हवाई दलाच्या जवानांनी केलेली आहेत.
गुजरात व राजस्थानमधील मोठय़ा भागाला पुराचा जबरदस्त तडाखा बसला आहे. या ठिकाणी बचावकार्यासाठी सदर्न कमांड व साऊथ वेस्टर्न कमांडच्या जवानांना तैनात करण्यात आले आहे. त्यांनी एक हजाराहून अधिक लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले असून, सुमारे २४०० लोकांना अन्न, पिण्याचे पाणी व औषधे यासारख्या आवश्यक वस्तू पुरवण्यात आल्या आहेत. एकूण २८ मदत पथके, ७ वैद्यकीय पथके आणि ७ अभियांत्रिकी कार्यपथके मदतकार्यासाठी तैनात करण्यात आल्याचे लष्कराच्या सूत्रांनी सांगितले.
गुजरातमधील बनासकांठा व भूज आणि राजस्थानमधील चिरपाटिया, धनेरा व सांचोर येथे पूरग्रस्तांसाठी लष्कराच्या छावण्या स्थापन करण्यात आल्या आहेत.
लष्करी जवानांच्या शौर्याच्या अनेक कहाण्या ऐकायला मिळत आहेत. गुजरातच्या कच्छ जिल्ह्य़ातील भूजपासून ५० किलोमीटर उत्तरेकडे असलेल्या शेरवो खेडय़ात बुडत असलेली एक महिला व तिचे बाळ यांना हवालदार युसूफ याने वाचवले. २७ ते ३० जुलै या कालावधीत मुसळधार पाऊस आणि पूर यामुळे शेरवो खेडय़ाला हुडको खेडय़ाशी जोडणाऱ्या एकमेव रस्त्याचे अतोनात नुकसान झाल्याने या खेडय़ाचा बाह्य़ जगाशी संपर्क व पुरवठा बंद झाला होता. लष्कर व गुजरात पोलिसांच्या एका पथकाने ३१ जुलैपासून मदतकार्य व लोकांना हलवण्याच्या कामाला सुरुवात केली.
हवाई दलानेही पूरग्रस्तांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यासाठी आणि अन्नाची हजारो पाकिटे टाकण्यासाठी अनेक उड्डाणे केली.
जीव धोक्यात घालून मदतकार्य
वाहत्या पाण्यातून दोर आणि मानवी साखळी यांच्या सहायाने गावकऱ्यांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात येत होते.
एका रस्त्याच्या खचलेल्या जागी मूल कडेवर घेतलेल्या एका महिलेचा तोल जाऊन ती पाण्यात पडली. युसूफने हे पाहताच पाण्यात उडी घेतली. त्या महिलेला पाण्यातून वाहून नेताना बाळाला वाचवण्यासाठी पाण्याच्या पृष्ठभागावर धरून ठेवले.
याच खेडय़ात एक कुत्रा खोल पाण्यात
जीव वाचवण्यासाठी धडपडत असल्याचे पाहिल्यानंतर सुधीर यादव याने त्याला पुरातून ७ किलोमीटपर्यंत सोबत नेले.
द. बंगालमधील पूरस्थिती गंभीर
दक्षिण बंगालमधील पूरपरिस्थिती गंभीर झाली असून या पुरात मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या अर्धशतकाजवळ गेली आहे. महापुराचा फटका बसलेल्या १२ जिल्ह्य़ांमध्ये सुरू करण्यात आलेल्या १५३७ मदत शिबिरांमध्ये २.१४ लाख लोकांनी आश्रय घेतला आहे. येत्या २४ तासांमध्येही जोरदार पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

निरनिराळ्या जिल्ह्य़ांमधून आणखी ९ पूरबळींची नोंद झाल्यामुळे पाऊस आणि पूर यांच्यामुळे मरण पावलेल्यांची संख्या ४८ पर्यंत पोहोचली असल्याचे आपदा व्यवस्थापन विभागाच्या सूत्रांनी सांगितले.

पुरामुळे बेघर झालेल्या २ लाख १४ हजार लोकांना आसरा देण्यासाठी एकूण १५३७ मदत शिबिरे आणि २०४ वैद्यकीय शिबिरे सुरू करण्यात आली आहेत. पूरग्रस्तांची एकूण संख्या सुमारे ३७ लाख आहे.

या नैसर्गिक आपत्तीमुळे ३८,०४६ घरांचे पूर्णपणे, तर २ लाखांहून अधिक घरांचे अंशत: नुकसान झाले आहे. ४ लाख ७२ हजार ६४५ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे पुरामुळे नुकसान झाले आहे.

मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी रविवारी सचिवालयात वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेऊन पूरस्थितीचा आढावा घेतला. योग्य ती पावले  उचलावीत अशा सूचना आपण अधिकाऱ्यांना दिल्याचे त्यांनी सांगितले.