एलटीटीई या संघटनेवर निर्णायक विजय मिळविण्याच्या घटनेस रविवारी पाच वर्षे पूर्ण झाल्यानंतर हा विजयोत्सव साजरा करण्यापासून दूर राहणाऱ्या देशांवर श्रीलंकेचे अध्यक्ष महिन्द्र राजपक्षे यांनी टीका केली आहे. हे देश ‘अंध, बहिरे आणि मूक’ असल्याची तोफ राजपक्षे यांनी डागली आहे. तामिळी वाघांशी सुरू असलेले युद्ध २००९ मध्ये संपुष्टात आल्यानंतर श्रीलंकेने केलेल्या प्रगतीचीही दखल या देशांनी घेतलेली नाही, असे ते म्हणाले.
एलटीटीईविरोधातील कारवाईस पाच वर्षे पूर्ण झाल्याच्या पाश्र्वभूमीवर श्रीलंकेच्या दक्षिणेकडील मातारा या सिंहलींच्या मुख्य प्रदेशात एक विजय सोहळा आयोजित करण्यात आला होता. आम्ही हा विजय साजरा करीत आहोत, परंतु काही देश मुके, आंधळे आणि बहिरे झाले असून त्यामुळेच या घटनेकडे त्यांचे लक्ष गेल्याचे दिसत नाही, या शब्दांत राजपक्षे यांनी शरसंधान केले. या कार्यक्रमास कॅनडासह बहुतेक देशांचे राजदूत अनुपस्थित राहिले होते.
असा विजयोत्सव साजरा करू नये, असे मत काही देशांनी व्यक्त केलेले असतानाही हा सोहळा साजरा करण्याचा निर्णय आम्ही घेतला. आम्ही शांततेचा विजय साजरा करीत आहोत, युद्धाचा विजय नव्हे, असेही राजपक्षे यांनी स्पष्ट केले. यानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या संचलनात लष्कराचे आठ हजारांहून अधिक सैनिक सहभागी झाले होते.