इंडियन मुजाहिदीनचा संशयित अतिरेकी झाकीर (वय ३०) याला राजस्थानच्या दहशतवाद विरोधी पथकाने अटक केली आहे. प्रतापनगर येथील लाला लजपत वसाहतीत त्याला पकडण्यात आले. तो इंडियन मुजाहिदीनच्या राजस्थान मोडय़ुलशी संबंधित असून मोडय़ुलच्या अनेक सक्रिय सदस्यांना मदत करीत होता. इंडियन मुजाहिदीनचा अतिरेकी अशरफ याच्या जाबजबाबातून त्याचे नाव निष्पन्न झाले होते. अशरफ याला १ मे रोजी राजस्थानातील स्लीपर मोडय़ुलच्या संदर्भात दिल्ली पोलिसांच्या खास पथकाने व एटीएसने अटक केली होती. झाकीर याला न्यायालयात हजर करण्यात आले असता त्याला शुक्रवारी १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी देण्यात आली. अधिकाऱ्यांच्या मते झाकीर हा जोधपूरचा रहिवासी असून गवंडी काम करीत होता. जोधपूरचा रहिवासी असलेला  तो सहावा संशयित अतिरेकी आहे. यापूर्वी इंडियन मुजाहिदीनचे पाच अतिरेकी मार्चमध्ये राजस्थानात पकडण्यात आले आहेत. अशरफ याला गेल्या आठवडय़ात चेन्नईत अटक करण्यात आली. तो जोधपूर येथे छापा पडल्यानंतर तेथून पळून जाण्यात यशस्वी झाला होता. एटीएस सध्या अशरफ याचे जाबजबाब घेत असून त्याला स्थानिक न्यायालयाने बुधवारी दहा दिवसांची न्यायालयीन कोठडी दिली होती.