जयपूरमध्ये शनिवारी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांची आमदार आणि खासदारांसोबत बैठक झाली. ही बैठक सुरु असतानाच पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि खासदार संवरलाल जाट हे बेशुद्ध पडले. जाट यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. मीडिया रिपोर्टनुसार, जाट यांना हृदयविकाराचा झटका आला आणि ते खाली कोसळले. ते बेशुद्ध पडले.

जाट बेशुद्ध पडल्यानंतर स्वतः मुख्यमंत्री वसुंधरा राजे, अमित शहा आणि ओम माथूर बैठक सुरु असलेल्या सभागृहातून बाहेर आले. त्यांनी रुग्णावाहिकेला पाचारण केले. या रुग्णवाहिकेतून त्यांना एसएमएस रुग्णालयात नेण्यात आले. याबाबत भाजपच्या एका पदाधिकाऱ्याने सांगितले की, “बैठक सुरू असताना जाट आपलं मत मांडण्यासाठी उभे राहिले. पण काही क्षणांतच ते खाली कोसळले. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात
आले आहे. अतिदक्षता विभागात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.” मुख्यमंत्री राजे आणि त्यांच्या मंत्रिमंडळातील सदस्य रुग्णालयात पोहोचले असून त्यांनी संवरलाल यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. दरम्यान, भाजपचे अध्यक्ष शहा हे शुक्रवारी येथे तीन दिवसांच्या दौऱ्यावर आले आहेत. पक्ष संघटना मजबूत कऱण्यासाठी ते आमदार आणि खासदारांसोबत बैठका घेत आहेत. हा त्यांच्या दौऱ्याचा दुसरा दिवस आहे.