राजेंद्रकुमार लाचखोरी प्रकरणी सीबीआयचे न्यायालयात स्पष्टीकरण

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचे माजी प्रधान सचिव राजेंद्रकुमार यांच्या जामीन अर्जाला सीबीआयने शनिवारी विशेष न्यायालयात विरोध केला. लाचखोरी प्रकरणात साक्षीदारांना सातत्याने धमक्या देण्याचे प्रयत्न केले जात असल्याचा आरोपही सीबीआयने केला.

आजमितीलाही या प्रकरणातील आरोपी साक्षीदारांना धमक्या देत असल्याचे आमच्याकडे पुरावे आहेत, अशा स्थितीत राजेंद्रकुमार यांना जामीन मिळाल्यास साक्षीदारांसाठी वातावरण अधिक धोकादायक बनेल, असे सीबीआयने विशेष न्यायमूर्ती अरविंदकुमार यांच्यासमोर स्पष्ट केले. राजेंद्रकुमार यांच्या जामीन अर्जावरील निर्णय २५ जुलैपर्यंत राखून ठेवण्यात आला आहे.

राजेंद्रकुमार यांना आता जामीन दिल्यास ते पुराव्यांमध्ये फेरफार करण्याची शक्यता आहे, असा दावा सीबीआयने केला. लाच नक्की कोणापर्यंत पोहोचली याबाबतचा तपास अत्यंत महत्त्वाच्या टप्प्यावर आला आहे, असेही सीबीआयने म्हटले आहे. साक्षीदारांना धमक्या देण्याचा प्रयत्न केला जात असल्याच्या तक्रारी आल्या आहेत, असेही न्यायालयात सांगण्यात आले.