लैंगिक छळाच्या आरोपप्रकरणी ‘वातावरण बदलविषयक आंतरराष्ट्रीय समिती’चे (आयपीसीसी) माजी अध्यक्ष आर. के. पचौरी तपासात सहकार्य करीत नसल्याची तक्रार पोलीसांनी न्यायालयामध्ये केली आहे. त्यामुळेच पचौरी यांना अटकपूर्व जामीन देण्यालाही पोलीसांनी विरोध केला होता. त्यांना पोलीस कोठडी देण्यात यावी, अशी मागणी सरकारी वकिलांनी न्यायालयात केली होती. दरम्यान, दिल्लीच्या न्यायालयाने पचौरी यांना २७ मार्चपर्यंत अटकेपासून अंतरिम संरक्षण दिले आहे.
‘टेरी’मध्ये काम करणाऱ्या एका संशोधक सहायिकेने पचौरी यांच्यावर लैंगिक छळ केल्याचा आरोप लावला आहे. यामुळे त्यांनी संयुक्त राष्ट्रसंघाच्या ‘आयपीसीसी’चा बुधवारी राजीनामा दिला. संयुक्त नोबेल पारितोषिक मिळालेले पचौरी यांना बुधवारी दिल्लीतील रुग्णालयात हृदयरोगावरील उपचारांसाठी दाखल करण्यात आले आहे. पचौरी यांचे तीन लॅपटॉप्स, मोबाईल फोन, टॅब्लेट आणि एक हार्ड डिस्क पोलीसांनी जप्त केले आहेत.