पाकिस्तानच्या अणू कार्यक्रमास उत्तर देण्यासाठी १९८५ साली भारताचे तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी सरकारने हायड्रोजन बॉम्बची चाचणी घेण्याची तयारी केली होती. नुकताच जारी करण्यात आलेल्या अमेरिकन दस्ताऐवजामुळे याचा खुलासा झाला आहे. त्यावेळी दक्षिण अशियात अणवस्त्र बनवण्याची स्पर्धा सुरू होईल या शक्यतेमुळे अमेरिकेचे तत्कालीन अध्यक्ष रोनाल्ड रेगन यांनी दोन्ही देशातील तणाव संपवण्यासाठी एक दूत पाठवण्याची योजना केली होती.
इकॉनॉमिक टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार अमेरिकन केंद्रीय गुप्तचर संस्थेच्या (सीआयए) ९,३०,००० गोपनीय दस्ताऐवजामुळे ही माहिती उजेडात आली आहे. सीआयएने या दस्ताऐवजातील १.२ कोटींहून अधिक पाने ऑनलाइन पोस्ट केले आहेत. यात १९८० दरम्यानच्या भारताच्या अणवस्त्र हत्यारांच्या क्षमतांबाबत महत्वपूर्ण माहिती मिळाली आहे. भारतातील कडक सुरक्षाव्यवस्थेमुळे भारताच्या अणु कार्यक्रमाची विस्तृत माहिती मिळवण्यासाठी कठीण गेले होते, असा उल्लेख सीआयएच्या दस्ताऐवजात केला आहे.

राजीव गांधी सरकारला ज्या हायड्रोजनबॉम्बची चाचणी करायची होती. ती ११ वर्षांपूर्वी इंदिरा गांधी सरकारने केलेल्या अणुचाचणीतील बॉम्बपेक्षाही शक्तिशाली होता. अणवस्त्रांबाबत भारत पाकिस्तानच्या अनेक पावले पुढे होता. परंतु राजीव गांधी हे अणु कार्यक्रमाचा विस्तार करण्याबाबत द्विधा मनस्थितीत होते. परंतु १९८५ मध्ये पाकिस्तान अणवस्त्रे बनवण्याच्या योजनेवर काम करत असल्याचा अहवाल मिळाल्यानंतर त्यांचा विचार बदलला. अणवस्त्रे बनवण्यासाठी पाकिस्तानकडून सातत्याने होत असलेल्या प्रयत्नांमुळे नाईलाजाने भारताला आपल्या अणवस्त्र नीतीची समीक्षा करावी लागत असल्याचे राजीव गांधी यांनी ४ मे १९८५ मध्ये म्हटले होते.
मुंबईतील भाभा अॅटोमिक रिसर्च सेंटर येथे ३६ वैज्ञानिकांच्या एका टीमने हायड्रोजन बॉम्ब तयार केला होता, असे सीआयएने म्हटले होते. भारत अणवस्त्रांसाठी प्लूटोनिअम जमा करत होता, असा दावाही सीआयएने केला आहे. परंतु आंतरराष्ट्रीय राजकारण आणि आर्थिक परिणामांचा विचार करून पाकिस्तानच्या अणवस्त्र प्लांटवर भारत हल्ला करणार नव्हता, असा निरीक्षण सीआयएने नोंदवले होते.