केंद्रीय गृहसचिव एल. सी. गोयल यांनी वैयक्तिक कारणास्तव स्वेच्छानिवृत्ती घेत असल्याचे जाहीर केल्यावर केंद्र सरकारने त्यांच्या जागी सोमवारी तातडीने ज्येष्ठ सनदी अधिकारी राजीव मेहरिषी यांची नियुक्ती केली. मेहरिषी हे सोमवार सेवानिवृत्त होणार होते, मात्र त्यांच्या नियुक्तीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मान्यता दिली. त्यामुळे केंद्र सरकारच्या सेवेतील सनदी अधिकाऱ्यांचे सर्वकाही आलबेल नसल्याचे संकेत मिळत आहेत.
अनिल गोस्वामी, परराष्ट्र सचिव सुजाता सिंह यांच्यापाठोपाठ आता गोयल यांनी आपला कार्यकाळ संपुष्टात येण्यापूर्वीच सेवेला रामराम ठोकला आहे. मारन समूहाच्या मालकीच्या सन टीव्हीला सुरक्षा पुरविणे, तिस्ता सेटलवाड यांच्या स्वयंसेवी संस्थांशी निगडित प्रश्न आणि नागा करार यावरून गृहमंत्रालयात तीव्र मतभेद निर्माण झाले होते. त्यामुळे गोयल यांनी राजीनामा दिल्याची चर्चा आहे.
गोयल यांची दोन वर्षांसाठी गृहसचिव पदावर नियुक्ती करण्यात आली होती. त्यांचा कार्यकाल संपुष्टात येण्यास अद्याप १७ महिन्यांचा कालावधी शिल्लक होता. राजस्थान श्रेणीतील सनदी अधिकारी असलेले मेहरिषी हे आर्थिक व्यवहार सचिव होते आणि सोमवारी ते सेवानिवृत्त होणार होते. मात्र आता त्यांची सोमवारपासून दोन वर्षांसाठी गृहसचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. शारदा चिटफंड घोटाळ्याप्रकरणी केंद्रीयमंत्री मतंगसिंह यांना अटक करण्यापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न केल्याचा ठपका तत्कालीन गृहसचिव अनिल गोस्वामी यांच्यावर ठेवण्यात आला होता.