छत्तीसगडच्या सुकमामधील नक्षलवादी हल्ल्याला दोन दिवस झाल्यानंतर केंद्र सरकारने केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या महासंचालकपदी राजीव राय भटनागर यांची नियुक्ती केली आहे. विशेष म्हणजे तब्बल ५७ दिवसांनंतर केंद्रीय राखीव पोलीस दलाला महासंचालक मिळाले आहेत. राजीव राय भटनगार १९८३ च्या बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. याबद्दलची अधिकृत घोषणा रात्री उशीरा करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

राजीव राय भटनागर यांच्याकडे सध्या नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोच्या (एनसीबी) महासंचालकपदाची जबाबदारी आहे. त्याआधी भटनागर यांनी केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या अतिरिक्त महासंचालकपदाची धुरा सांभाळली आहे. सध्या केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या संचालकपदाची जबाबदारी १९८४ च्या बॅचचे आयपीएस अधिकारी असलेल्या सुदीप लख्ताकिया यांच्याकडे आहे. कॅबिनेटच्या नियुक्ती समितीने भटनागर यांची निवड त्यांची जेष्ठता विचारात घेऊन केली, अशी माहिती सूत्रांनी दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी कॅबिनेटच्या नियुक्ती समितीचे प्रमुख आहेत.

फेब्रुवारी महिन्यात के. दुर्गा प्रसाद केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या महासंचालक पदावरुन निवृत्त झाले. यानंतर तब्बल दोन महिने केंद्रीय राखीव पोलीस दलाचे महासंचालक पद रिक्त होते. यावरुन सरकारवर टीकादेखील झाली होती. या काळात छत्तीसगडमध्ये दोनवेळा नक्षलवाद्यांचे हल्ले झाले. त्यामुळे मोदी सरकारवर मोठ्या प्रमाणात टीका झाली होती.