छत्तीसगडमधील सुकमामध्ये नक्षलवाद्यांकडून करण्यात आलेला हल्ला म्हणजे ‘सीआरपीएफ जवानांची थंड डोक्याने करण्यात आलेली हत्या’ असल्याचे गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी म्हटले आहे. ‘नक्षलवाद्यांनी केंद्रीय राखीव दलाच्या जवानांवर केलेला हल्ला हा भ्याड स्वरुपाचा असून जवानांचे हौतात्म्य वाया जाऊ देणार नाही,’ असे राजनाथ सिंह यांनी छत्तीसगडमधील रायपूरमध्ये पत्रकारांशी बोलताना म्हटले.

‘केंद्र आणि राज्य सरकारकडून संयुक्तपणे नक्षलवाद्यांविरोधात कारवाई करण्यात येईल,’ असे गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी म्हटले. यावेळी छत्तीसगडचे मुख्यमंत्री रमण सिंह उपस्थित होते. डाव्या विचारसरणीच्या कट्टरतावाद्यांबद्दलची केंद्र सरकारची रणनिती संपूर्णपणे बदलण्यात येणार असल्याची माहिती यावेळी राजनाथ सिंह यांनी दिली. ‘आम्ही संपूर्ण व्यूहनितीचा आढावा घेऊन त्यामध्ये बदल करु. आवश्यकता असल्यास नक्षलग्रस्त भागांना भेट देऊन व्यूहनिती आखली जाईल. मात्र डाव्या कट्टरतावादींची पाळेमुळे समूळ नष्ट करण्यात येतील,’ असे राजनाथ सिंह यांनी पत्रकारांना सांगितले. नक्षलवाद्यांविरुद्धच्या लढ्याची रणनिती ठरवण्यासाठी विविध राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची बैठक ८ मे रोजी बोलावण्यात आली आहे.

गृहमंत्री राजनाथ सिंह, छत्तीसगडचे मुख्यमंत्री हंसराज अहिर, केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांनी छत्तीसगडमधील माना कॅम्प परिसरात चौथ्या बटालियनच्या मुख्यालयात नक्षलवादी हल्ल्यात शहीद झालेल्या २५ जवानांना श्रद्धांजली वाहिली. यानंतर गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी मुख्यमंत्री आणि इतर अधिकाऱ्यांची बैठक घेतली. यासोबतच राजनाथ सिंह यांनी रामकृष्ण रुग्णालयातील जखमी जवानांची भेट घेतली.