दिल्लीतील सामूहिक बलात्कार आणि हत्याकांड प्रकरणातील एका आरोपीची ब्रिटिश चित्रपट निर्मात्याने तिहार कारागृहात मुलाखत घेण्याच्या प्रकाराला केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी तीव्र हरकत घेतली आहे. या प्रकरणी सविस्तर अहवाल सादर करावा, असा आदेश गृहमंत्र्यांनी कारागृहाच्या प्रमुखांना दिला आहे.
कारागृहात  आरोपीची मुलाखत घेण्याच्या प्रकरणाची गृहमंत्र्यांनी गंभीर दखल घेतली आहे. तिहार कारागृहाचे महासंचालक आलोककुमार वर्मा यांच्याशी चर्चा करून राजनाथ सिंह यांनी त्यांना तातडीने याबाबतचा अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत, असे सूत्रांनी सांगितले.
राजनाथ सिंह यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा करताना महासंचालकांनी, त्यांना संपूर्ण घटनाक्रम आणि त्यावर करण्यात आलेली कारवाई याचा तपशील सांगितला. ज्या बसमध्ये युवतीवर सामूहिक बलात्कार करण्यात आला त्या बसचा चालक मुकेशसिंह याला फाशीची शिक्षा ठोठावण्यात आली असून ब्रिटिश चित्रपट निर्माता लेस्ली अडविन आणि बीबीसीला त्याची मुलाखत घेण्याची परवानगी देण्यात आली होती, असे सांगण्यात येत आहे.

तातडीने फाशी देण्याची मागणी
मुकेशसिंह याने बीबीसी व चित्रपट निर्माते लेस्ली उद्वीन यांना मुलाखत देऊन आपल्या कृत्याचे समर्थन केल्याबद्दल बलात्कार पीडित मुलीच्या आई-वडिलांनी संताप व्यक्त केला असून अशी मुलाखत येणे ही बाब शरमेची असल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली. सरकारने या गुन्हेगारास तातडीने फाशी द्यावी, अशीही मागणी त्यांनी केली आहे.मुकेशसिंह याची वक्तव्ये निषेधार्हच असून त्याने कायद्याची चेष्टाच केली आहे. सरकारी अधिकाऱ्यांनी त्याच्यावर कायदेशीर कारवाई करावी, या शब्दांत मुलीच्या आईने संताप व्यक्त केला. या मुलीच्या वडिलांनीही तीव्र संताप व्यक्त केला. आम्ही कोणाला शिक्षा करू शकत नाही. माझ्या हाती असते तर त्या मुलीला जी शिक्षा या गुन्हेगारांनी दिली, तीच शिक्षा मी त्यांना दिली असती. परंतु त्याचे भवितव्य ठरविण्यासाठी आपल्याकडे कायदा आहे, असे ते म्हणाले. ही केवळ माझ्याच मुलीची बाब आहे असे नव्हे. आरोपीने समाजाबद्दलच प्रश्न विचारला असून त्याला फाशी दिली नाही तर कोणीही उठून महिलांवर बलात्कार करील आणि त्यामुळे देशाच्या भवितव्यालाच धोका निर्माण होईल, असा इशारा देऊन त्याला फाशी देण्यासाठी आपण पुन्हा सरकारशी संपर्क साधू, असे त्यांनी स्पष्ट केले.