मी संसदेत बोललो तर, भूकंप होईल, असे वक्तव्य करणाऱ्या काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांना केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी जबरदस्त टोला हाणला आहे. राहुल यांच्या बोलण्याने भूकंप तर दूरची गोष्ट आहे. पण साधी हवाही येणार नाही, असे राजनाथ म्हणाले. नोटाबंदीच्या निर्णयावर संसदेत चर्चा करण्याची मागणी करतानाच, काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी मी बोललो तर संसदेत भूकंप होईल, असे वक्तव्य केले होते. राहुलबाबांच्या या वक्तव्यावर व्यंकय्या नायडू यांनीही चिमटा काढला होता.

उत्तराखंडमधील आज झालेल्या रॅलीत राजनाथ सिंह बोलत होते. राहुल गांधी म्हणाले होते की, मी बोललो तर भूकंप होईल. पण ते तर रोजच बोलतात. पण साधी हवाही येत नाही, असे राजनाथ म्हणाले. नोटाबंदीचा निर्णय धाडसी असल्याचे सांगून त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तोंडभरुन स्तुती केली. भारताला आर्थिक महासत्ता बनवायची असल्यास काही धाडसी आणि कठोर पावले उचलावीच लागतील, असेही ते म्हणाले.

दरम्यान, नोटाबंदीच्या मुद्द्यावरून विरोधकांनी घातलेल्या गोंधळामुळे संसदेच्या कामकाजात बाधा येत आहे. विरोधी पक्ष या मुद्द्यावर चर्चा करण्यापासून पळ काढत आहेत, असा आरोप सत्ताधारी पक्ष करत आहे. तर दुसरीकडे विरोधक मतविभाजनाच्या नियमांनुसार चर्चेची मागणी करत आहेत. पंतप्रधान मोदी यांनी चर्चेसाठी सभागृहात उपस्थित राहावे, अशी मागणी करत विरोधकांनी जोरदार गदारोळ आणि घोषणाबाजी केली आहे. काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनीही नोटाबंदीचा निर्णय मूर्खपणाचा असल्याचे शुक्रवारी म्हटले होते. तसेच मी संसदेत बोललो तर मोठा भूकंप होईल, असे वक्तव्य केले होते. त्यावर केंद्रीय मंत्री व्यंकय्या नायडू आणि स्मृती इराणी यांनीही टीका केली होती.