सरसंघचालकांपाठोपाठ उद्धव ठाकरेंचे दिल्लीमुक्कामी गृहमंत्र्यांशी गुफ्तगू

भाजप आणि शिवसेनेमधील तणावाच्या पाश्र्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह हे अघोषित समन्वयक म्हणून पुढे येताना दिसत आहेत. बुधवारी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिल्लीत सर्वप्रथम गृहमंत्र्यांची आवर्जून सदिच्छा भेट घेतल्याने तर राजनाथांची नवी भूमिका ठळकपणे अधोरेखित झाली. यापूर्वी परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांच्याकडे ती भूमिका असायची.

बुधवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास उद्धव ठाकरे हे ‘अकबर रोड’वरील राजनाथांच्या निवासस्थानी गेले. त्यांच्यासोबत आदित्य ठाकरेवगळता अन्य कोणी नव्हते. या भेटीमध्ये भाजप-शिवसेना यांच्यातील तणाव, नोटाबंदीवरील भूमिका आदींवर प्रामुख्याने चर्चा झाल्याचे समजते. विशेष म्हणजे, राजनाथांबरोबरील भेट राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांच्याशी उद्धव ठाकरेंनी नागपूरमुक्कामी केलेल्या गुफ्तगूनंतर लगेचच झाली आहे.

नोटाबंदीविरोधात पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी काढलेल्या मोच्र्यामध्ये शिवसेना खासदारांचा सहभाग मोदी सरकारच्या जिव्हारी लागला होता. विशेष म्हणजे, अरुण जेटली व व्यंकय्या नायडू या दोन मंत्र्यांनी वारंवार केलेली विनंती अव्हेरून शिवसेना ममतांसोबत गेल्याने तर वातावरण आणखी तापले होते. तेव्हा राजनाथांनी उद्धव ठाकरेंशी चर्चा केली होती. त्यानंतर वातावरण निवळले. मग पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शिवसेनेच्या खासदारांशी संवाद साधला.

तेव्हापासून राजनाथांशी शिवसेनेचा संपर्क आणि समन्वय वाढला आहे. मध्यंतरी समन्वय साधण्यासाठी आपल्या संपर्कात राहण्याची सूचना राजनाथांनी शिवसेनेच्या काही वरिष्ठ  खासदारांना केली होती. त्या पाश्र्वभूमीवर राजनाथ आणि उद्धव यांच्या भेटीकडे पाहिले जात आहे.

मोदी आणि पक्षाध्यक्ष अमित शहा यांच्यापेक्षा सुषमा स्वराज यांच्याशी शिवसेनेचे मधुर संबंध आहेत, पण सध्या प्रकृतीकारणास्तव सुषमा रुग्णालयात दाखल आहेत.  वाजपेयी सरकारप्रमाणे आताही राष्ट्रीय लोकशाही आघाडीचा (एनडीए) समन्वयक असण्याची शिवसेनेची अनेकवार मागणी केली, पण त्याकडे दुर्लक्ष केले आहे. पण आता अनौपचारिकरीत्या शिवसेनेशी समन्वय साधण्याचे काम राजनाथांकडे सोपविल्याचे दिसते.

शिवसेनेचे राज्यसभा खासदार राजकुमार धूत यांच्या कन्येचा विवाह आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या कन्येच्या विवाहाच्या स्वागतसोहळ्यास उपस्थित राहण्यासाठी उद्धव ठाकरे दिल्लीत आले आहेत.