राजस्थानमध्ये आठ शिक्षकांनी १३ वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. नराधम शिक्षकांनी मुलीला जबरदस्तीने गर्भनिरोधक गोळ्या खायला दिल्या असून या गोळ्यांच्या अतिसेवनामुळे मुलीला कर्करोग झाल्याचा आरोप पीडितेच्या पालकांनी केला आहे.

बिकानेरमध्ये राहणाऱ्या १३ वर्षाच्या मुलीवर शाळेतील आठ शिक्षकांनी सामूहिक बलात्कार केल्याची तक्रार मुलीच्या पालकांनी केली आहे. शाळा सुटल्यावर नराधम शिक्षक पीडितेला शाळेत थांबवून ठेवायचे. अतिरिक्त तासाच्या नावाखाली तिला एका खोलीत नेले जायचे आणि तिथे तिच्यावर अत्याचार केले जायचे. नराधमांनी पीडितेचा अश्लील व्हिडीओदेखील तयार केला होता. या व्हिडीओच्या आधारे ब्लॅकमेल केले जायचे. पीडितेने भीती पोटी पालकांना हा प्रकार सांगितला नाही. दीड वर्षांपासून तिच्यावर अत्याचार सुरुच होते. दुर्दैवी बाब म्हणजे पीडितेच्या पालकांना हा प्रकार समजला होता. मात्र पोलीस तक्रार केल्यास समाजात नाचक्की होईल या भीतीपोटी त्यांनी पोलिसांकडे जाणे टाळले. सध्या पीडितेवर बीकानेरमधील कर्करोग रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

शिक्षकांनी केलेल्या अत्याचारांमुळे पीडित गर्भवतीही झाली होती. मात्र नराधमांनी तिला गर्भपाताच्या गोळ्या दिल्या. गर्भनिरोधक आणि गर्भपाताच्या गोळ्यांच्या अतिसेवनामुळे माझ्या मुलीला कर्करोग झाला असा आरोप पीडितेच्या वडीलांनी केला आहे. मुलीचे हाल बघून मी शेवटी पोलिसांकडे तक्रार दाखल करण्याचा निर्णय घेतला असे तिच्या वडीलांनी म्हटले आहे. गेल्या वर्षभरापासून शिक्षक माझ्या कुटुंबीयांना धमकावत असल्याचे त्यांनी तक्रारीत म्हटले आहे. सध्या आठही शिक्षक पसार असून त्यांचा शोध सुरु आहे. पोलिसांनी या घटनेची गंभीर दखल घेत तपासाला सुरुवात केली आहे. भाजप आणि काँग्रेसच्या नेत्यांनीही या घटनेचा तीव्र शब्दात निषेध केला आहे.

दरम्यान, हिंदूस्थान टाईम्सने दिलेल्या वृत्तानुसार पीडित मुलीचे पालक आणि शिक्षक यांच्यात समाजातील काही मंडळीनी बैठक घेतली होती. या बैठकीत हे प्रकरण दडपण्यात आले होते. मात्र दोन दिवसांपूर्वी यातील एका शिक्षकाने पीडितेच्या चूलत भावांविरोधात मारहाण आणि धमकीची तक्रार दाखल केली होती. त्यानंतर पीडितेच्या वडीलांनीही पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे. दोन्ही बाजूंनी तक्रार दाखल झाली हे खरे असले तरी पीडित मुलीच्या पालकांनी केलेले आरोप गंभीर आहेत, या संपूर्ण घटनेचा सखोल तपास केला जाईल असे पोलिसांनी सांगितले. पोलिसांनी शाळेतील आणि ग्रामस्थांचा जबाब घेतला आहे. तर महिला आयोगानेही या घटनेची दखल घेतली आहे.