केंद्राकडे खासदार राजू शेट्टी यांची तक्रार

एकीकडे अतिरिक्त उपलब्धतेने कांद्याचे भाव पन्नास पैसे किलोपर्यंत कोसळले असतानाच, अतिरिक्त कांदा खरेदी करून बाजार सावरण्याची जबाबदारी असलेल्या ‘नाफेड’ व लघू शेतकरी व्यापार महासंघ या संस्थेने आपल्याकडीच कांदा बाजारात विक्री आणल्याचे समजते. कांद्याचे विक्रमी भाव कोसळण्यात त्यांचाही हातभार लागल्याचे चित्र आहे.

अतिरिक्त उत्पादनामुळे ‘नाफेड’ व लघू शेतकरी व्यापार महासंघाने आतापर्यंत सुमारे १७ हजार टन कांद्याची खरेदी केली आहे. त्यांनी आणखी खरेदी करून अतिरिक्त उपलब्धता कमी करणे अपेक्षित आहे, मात्र याउलटच घडताना दिसत आहे. या दोन्ही संस्थांनी आपल्याकडील साठा नाशिकच्या बाजार समित्यांमध्ये विक्रीसाठी आणला असल्याचे समजते. परिणामी, उपलब्धता आणखी वाढून भाव कोसळण्याला चालना मिळाल्याचे सांगण्यात आले.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी यासंदर्भात बुधवारी केंद्रीय कृषिमंत्री राधामोहनसिंह यांना भेटले. त्यानंतर अन्न व नागरी पुरवठामंत्री रामविलास पासवान यांच्या मंत्रालयालाही त्यांनी पत्र देऊन ‘नाफेड’कडून होत असलेल्या विक्रीची दखल घेण्याची मागणी केली. केंद्राने दिलेल्या महागाई स्थिरता निधीचा हा गैरवापर असल्याचे त्यांनी नमूद केले आहे.

१३ हजार टन परराज्यांत

सुदैवाने मागील पंधरवडय़ात नाशिकमधील बाजारपेठांमधून सुमारे १३ हजार टन कांदा बिहार, आसाम आणि पश्चिम बंगालमध्ये पाठविण्यात आला आहे. या तीन राज्यांत पूरस्थिती असूनही मालाला उठाव आहे. पूरस्थिती सुधारली तर आणखीनच चांगला भाव मिळण्याची शक्यता वर्तविली जात आहे. पुढील आठवडय़ातही कांदा परराज्यांत पाठविला जाण्याची शक्यता आहे. परिणामी, पुढील काही दिवसांत राज्यातील भाव सावरण्याची शक्यता वर्तविली जात आहे.