माजी लष्करप्रमुख आणि केंद्रीय राज्यमंत्री व्ही. के. सिंह यांच्या विधानाच्या मुद्द्यावरून सलग दुसऱ्या दिवशी राज्यसभेचे कामकाज तहकूब झाले. बहुजन समाज पक्षाने गुरुवारी उपस्थित केलेल्या या मुद्द्यामध्ये आता प्रमुख विरोधी काँग्रेसनेही आपले सूर मिसळले असून, व्ही. के. सिंह यांची केंद्रीय मंत्रिमंडळातून आणि संसदेतून हकालपट्टी करण्याची मागणी विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद यांनी शुक्रवारी राज्यसभेत केले. काँग्रेस आणि बसपच्या खासदारांनी अध्यक्षांसमोरील मोकळ्या जागेत जमून घोषणाबाजी केल्यामुळे राज्यसभेचे कामकाज दुपारी एक तासासाठी तहकूब करण्यात आले.
राज्यसभेमध्ये प्रश्नोत्तराचा तास सुरू होण्यापू्र्वीच बसपच्या सदस्यांनी अध्यक्षांसमोरील मोकळ्या जागेत जमून व्ही. के. सिंह यांच्याविरोधात घोषणाबाजी केली. त्यानंतर गुलाम नबी आझाद यांनी व्ही. के. सिंह यांची मंत्रिमंडळातून आणि संसदेतून सरकारने हकालपट्टी करावी, अशी मागणी केली. त्यांना या पदांवर राहण्याचा काहीही अधिकार नाही, असेही ते म्हणाले. त्यांच्या भाषणानंतर काँग्रेस आणि बसपच्या सदस्यांनी पुन्हा एकदा जोरदार घोषणाबाजी करण्यास सुरुवात केली. त्यातच सरकारकडून मुख्तार अब्बास नक्वी यांनी या विषयावरून केवळ राजकारण सुरू असल्याचे सांगितले. व्ही. के. सिंह यांनी केलेल्या विधानाचा चुकीचा अर्थ लावण्यात येत असून, मुद्दामहून कामकाज रोखण्यासाठी त्याचा वापर केला जात आहे, असे त्यांनी सांगितले. त्यानंतरही विरोधकांची घोषणाबाजी सुरूच राहिल्यामुळे सभापती हमीद अन्सारी यांनी सभागृहाचे कामकाज एक तासासाठी तहकूब केले.