बँकांचे हजारो कोटींचे कर्ज बुडवून परदेशात जाऊन बसलेले उद्योगपती विजय मल्ल्या यांचा राजीनामा बुधवारी राज्यसभेत स्विकारण्यात आला. राज्यसभेचे अध्यक्ष हमीद अन्सारी यांच्याकडून मल्ल्यांचा राजीनामा स्विकारण्यात आल्याची माहिती उपाध्यक्ष पी.जे. कुरियन यांनी सभागृहात दिली. या निर्णयाची तात्काळ अंमलबजावणी करण्याचे आदेशही राज्यसभा अध्यक्षांकडून देण्यात आले.
राज्यसभेच्या शिस्तपालन समितीकडून विजय मल्ल्या यांना आपली बाजू मांडण्यासाठीची नोटीस पाठविण्यात आली होती. बँकांचे हजारो कोटींचे कर्ज बुडवून परदेशात जाऊन बसल्याने मल्ल्या यांच्या खासदारकीवर गदा येणार हे जवळपास स्पष्ट झाले होते. मात्र, तसा निर्णय येण्याआधीच मल्ल्या यांनी आपल्या पदाचा राजीनामा सभापतींकडे पाठवून दिला होता.
दरम्यान, गेल्या आठवड्यात परराष्ट्र मंत्रालयाकडून मल्ल्या यांचा पासपोर्ट रद्द करण्यात आला. सक्तवसुली संचालनालयाच्या (ईडी) विनंतीवरून मल्ल्या यांचा पासपोर्ट रद्द करण्यात आला, तर संप्पत्तीची संपूर्ण माहिती बँकांना देण्याचे आदेश सुप्रीम कोर्टाने मल्ल्या यांना दिले आहेत.