रामनाथ कोविंद यांची देशाचे चौदावे राष्ट्रपती म्हणून निवड झाल्याची घोषणा होताच त्यांच्या कुटुंबातील सदस्य आणि नातेवाईक राहत असलेल्या कानपूर देहातमधील झिनझाक येथे आनंद व जल्लोषाची लहर पसरली.

कोविंद यांच्या निवडीचे वृत्त कळताच, त्यांच्या गावात लोकांनी तुपाचे दिवे लावले, मिठाई वाटली आणि अभिनंदनासाठी आलेल्यांचे गुलाल माखून व फुले देऊन स्वागत केले. यामुळे लखनौपासून १६० किलोमीटरवर असलेल्या झिनझाक येथे उत्सवाचे वातावरण निर्माण झाले. नवनियुक्त राष्ट्रपतींच्या शपथविधीसाठी २३ जुलैला रेल्वेने दिल्लीला जाणार असलेल्या त्यांच्या कुटुंबीयांनी यापूर्वीच शपथविधी समारंभासाठी नवे कपडे खरेदी करण्यास सुरुवात केली आहे. ज्या दिवशी आमच्या काकांचे नाव जाहीर झाले, त्याच दिवशी ते भरघोस मतांनी विजयी होतील याची आम्हाला खात्री होती. ते देशाच्या सर्वोच्च पदावर विराजमान होत असल्याचा आम्हाला अभिमान आहे.

लहानपणी ज्यांच्या मांडीवर आम्ही खेळलो, ते राष्ट्रपती म्हणून निवडून आले ही गोष्ट कधीकधी अविश्वसनीय वाटते, असे कोविंद यांच्या पुतणी हेमलता यांनी पीटीआयला सांगितले. या निवडीमुळे केवळ आमचे कुटुंबच नव्हे, तर संपूर्ण गाव होळी व दिवाळी साजरी करत आहे, असेही हेमलता म्हणाल्या.