देशाचे पहिले दलित राष्ट्रपती के. आर. नारायणन यांच्याप्रमाणेच रालोआचे राष्ट्रपतिपदाचे उमेदवार रामनाथ कोविंद हेही अत्यंत सामान्य कुटुंबातून आलेले नेते आहेत, मात्र आपल्या सार्वजनिक जीवनात सर्वोच्च पदापर्यंत पोहोचण्यासाठी दोन्ही नेत्यांनी अवलंबिलेले मार्ग वेगवेगळे आहेत. बिगर रालोआ पक्षांनीही कोविंद यांना पाठिंबा दिल्याने ते भारताचे १४ वे राष्ट्रपती होणार हे निश्चित आहे.

के. आर. नारायणन हे राजनैतिक अधिकारी होते आणि त्यांना माजी पंतप्रधान स्व. इंदिरा गांधी यांनी काँग्रेस पक्षात येण्यास सांगितले. त्यांनी वयाच्या ६४ व्या वर्षी प्रथम लोकसभेची निवडणूक लढविली तर कोविंद हे भाजपच्या फळीतून वर आलेले नेते असून त्यांनी संघटनेत विविध पदे भूषविली आहेत.

नारायणन यांनी केरळमधून सलग तीन निवडणुका जिंकल्या आणि माजी पंतप्रधान स्व. राजीव गांधी यांच्या मंत्रिमंडळात ते मंत्री होते. कोविंद लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीत पराभूत झाले होते, मात्र भाजपने त्यांना १९९४ आणि २००० मध्ये राज्यसभेवर पाठविले होते.

नारायणन यांची विचारसरणी डावीकडे झुकणारी असल्याने माजी पंतप्रधान स्व. पी. व्ही. नरसिंह राव यांनी त्यांना मंत्री केले नाही, असे बोलले जाते. मात्र शंकर दयाळ शर्मा यांना राष्ट्रपतिपदासाठी पाठिंबा देण्याच्या बदल्यात नारायणन यांना उपराष्ट्रपती करण्याची डाव्यांची अट होती अशी चर्चा आहे. उपराष्ट्रपती असल्याने नारायणन हे १९९७ मध्ये नैसर्गिक न्यायाने राष्ट्रपतिपदाचे उमेदवार होते आणि काँग्रेस ते भाजपसह सर्व प्रमुख पक्षांनी त्यांना पाठिंबा दिला.

राज्यसभेत विविध विषयांची मांडणी

दूरदर्शनवरून प्रसारित केल्या जाणाऱ्या अश्लील दृश्यांवर बंदी घालावी आणि एक हजार रुपयांच्या नोटेवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा छापावी, असे विविध विषय रामनाथ कोविंद यांनी संसदेचे सदस्य या नात्याने सभागृहात मांडले आहेत.