केंद्र सरकारकडून लवकरच राज्यांसाठी मार्गदर्शक तत्त्वे

एखाद्या थाळीतील पदार्थाचे प्रमाण ग्राहकांना सांगण्याची ‘खुशीची सक्ती’ उपाहारगृहांना करू इच्छिणारे केंद्रीय अन्न व ग्राहक व्यवहार मंत्री रामविलास पासवान यांनी आता हॉटेल कर्मचाऱ्यांना दिल्या जाणाऱ्या ‘टिप’ अर्थात सेवाशुल्कावर बडगा उगारला आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार सेवाशुल्क नावाचा प्रकारच अस्तित्वात नाही. तेव्हा हॉटेलचालकांनी तो घेता कामा नये. या ‘टिप’पद्धतीच्या विरोधात कारवाई करण्याबाबतची मार्गदर्शक तत्त्वेही पासवान यांच्या खात्याने तयार केली असून, ती लवकरच सर्व राज्यांना जारी करण्यात येणार आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अन्नपदार्थाच्या नासाडीबाबत आपल्या भाषणातून चिंता व्यक्त केल्यानंतर रामविलास पासवान यांनी हॉटेलांकडे आपली नजर वळविली होती. हॉटेलचालकांनी एखाद्या थाळीत किती पदार्थ येतो याची माहिती ग्राहकांना द्यावी. त्यातून हॉटेलांत अन्न उष्टे पडण्याचे प्रमाण कमी होईल अशी योजना त्यांनी सुचविली होती. त्याची समाजमाध्यमांतून मोठय़ा प्रमाणावर खिल्ली उडविण्यात आली. त्या टीकेनंतर त्यांनी त्याबाबत कायदा करण्याचा कोणताही विचार नसल्याचे स्पष्ट केले. तो विषय चर्चेत असतानाच आता पासवान यांनी सेवाशुल्क अर्थात ‘टिप’ या प्रकाराकडे लक्ष वळविले आहे. कोणत्याही ग्राहकावर सेवाशुल्क भरण्यासाठी सक्ती करता कामा नये. ग्राहकांची इच्छा असल्यास ते वेटरना ‘टिप’ देऊ शकतात किंवा सेवाशुल्क भरण्यास मान्यता देऊ शकतात. ग्राहकांच्या संमतीशिवाय सेवाशुल्क आकारणे हे ग्राहक संरक्षण कायद्याच्या तरतुदींच्या विरोधात आहे. ग्राहकांना मेन्यू कार्डवरच सेवाशुल्काविषयी माहिती दिली जावी, असे पासवान यांनी सांगितले. या विषयावरील मार्गदर्शक तत्त्वे पंतप्रधान कार्यालयाकडे मंजुरीसाठी पाठविण्यात आली आहेत. पंतप्रधान कार्यालयाकडून त्यास मंजुरी मिळाल्यावर ती राज्यांना जारी करण्यात येतील, असे पासवान यांनी स्पष्ट केले. दरम्यान, मुंबई ग्राहक पंचायतीने केंद्राच्या निर्णयाचे स्वागत केले आहे.

पासवान म्हणतात..

  • कोणत्याही ग्राहकावर सेवाशुल्क भरण्यासाठी सक्ती करता कामा नये.
  • ग्राहकांची इच्छा असल्यास ते वेटरना ‘टिप’ देऊ शकतात
  • ग्राहकांच्या संमतीशिवाय सेवाशुल्क आकारणे हे ग्राहक संरक्षण कायद्याच्या तरतुदींच्या विरोधात
  • पेप्सीचे अ‍ॅक्वाफिना हे बाटलीबंद पाणी आता देशभरात एकाच किमतीत ग्राहकांना उपलब्ध होणार