राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांचे विजयादशमीनिमित्त नागपूरात झालेल्या भाषणाचे थेट प्रक्षेपण केल्याला ज्येष्ठ विचारवंत रामचंद्र गुहा यांनी आक्षेप घेतला आहे. मोहन भागवत यांच्या भाषणाचे थेट प्रक्षेपण केले म्हणून कोणीतरी दूरदर्शनविरोधात याचिका दाखल करेल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे. सोशल नेटवर्किंग साईट ट्विटरवर केलेल्या ट्विटमध्ये त्यांनी या भाषणाला आक्षेप घेतला.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही हिंदू संघटना आहे. त्यांच्या भाषणाचे थेट प्रक्षेपण केल्यामुळे भविष्यात मशिदीतील इमामांकडून किंवा चर्चमधील पादरींकडून त्यांच्याही भाषणाचे थेट प्रक्षेपण करण्याची मागणी दूरदर्शनकडे केली जाईल, अशी शक्यता त्यांनी वर्तविली आहे.
विजयादशमीनिमित्त संघ स्वयंसेवकांना उद्देशून मोहन भागवत यांनी नागपूरमध्ये भाषण केले. या भाषणाचे थेट प्रक्षेपण डीडी नॅशनल वाहिनीवरून करण्यात आले. या थेट प्रक्षेपणाला कॉंग्रेसनेदेखील आक्षेप घेतला आहे.