‘भारत माता की जय’ न म्हणणाऱ्यांचा गळाच कापला असता, असे प्रक्षोभक वक्तव्य करणाऱ्या योगगुरू रामदेवबाबा यांना उपरती झाली असून, त्यांनी आपल्या विधानावरून मंगळवारी माघार घेतली. आपण केवळ एमआयएमचे खासदार असदुद्दिन ओवेसी यांना प्रत्युत्तर देण्यासाठी तसे म्हणालो होतो. पण आपण तसे काहीही करणार नसल्याचे रामदेव बाबा यांनी मंगळवारी नवी दिल्लीमध्ये पत्रकार परिषदेत सांगितले.
इस्लाम किंवा ख्रिश्चन धर्माविरूद्ध अवमानकारक वक्तव्य करणे हे ओवेसी यांनी केलेल्या वक्तव्याइतकेच मूर्खपणाचे ठरते, असेही रामदेवबाबा यांनी सांगितले. आपल्या गळ्यावर कोणी चाकू ठेवला तरी आपण ‘भारत माता की जय’ म्हणणार नाही, असे वक्तव्य असदुद्दिन ओवेसी यांनी केले होते. ‘भारत माता की जय’ म्हणण्याची जबरदस्ती का, असा प्रश्न ओवेसी यांनी उपस्थित केला. त्यानंतर रामदेवबाबा यांनी जर देशामध्ये कायदा नसता, तर ‘भारत माता की जय’ न म्हणणाऱ्यां लाखो लोकांचा गळाच आपण कापला असता, असे वादग्रस्त वक्तव्य केले होते. त्यावरून त्यांच्यावर टीका करण्यात आली होती. जर कोणत्या धर्मामध्ये मातृभूमीचा आदर करा, असे शिकवत नसतील, तर तो धर्मच देशहिताचा नाही, असेही रामदेवबाबांनी म्हटले होते.