योगगुरू रामदेव बाबा यांनी मंगळवारी हरियाणा सरकारने त्यांना देऊ केलेला कॅबिनेट मंत्रिपदाचा दर्जा स्वीकारण्यास साफपणे नकार दिला. बाबांना बाबाच राहू द्या, त्यांना मंत्री बनवू नका, असे त्यांनी एका कार्यक्रमात स्पष्ट केले. यावेळी हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर उपस्थित होते.
हरियाणा सरकारने रामदेव बाबांना राज्याचा ब्रॅंड अॅम्बेसिडर बनवले आहे. त्याचवेळी त्यांना मंत्रिपदाचा दर्जा देण्यात येईल, अशी घोषणा तेथील राज्य सरकारने केली होती. मात्र, मंत्रिपदाचा दर्जा स्वीकारण्यास रामदेव बाबांनी नकार दिला. ते म्हणाले, देशाचे पंतप्रधान आपले आहेत. सरकार आपले आहे. असे असताना रामदेब बाबांना बाबाच राहू द्या. कॅबिनेट मंत्रिपदामध्ये आपल्याला कोणताही रस नसल्याचे त्यांनी सांगितले.
रामदेव बाबांना ब्रॅंड अॅम्बेसिडर बनवून द्यांना मंत्रिपदाचा दर्जा देण्यात आल्यामुळे विरोधकांनी खट्टर सरकारवर टीका केली होती. या पार्श्वभूमीवर रामदेव बाबांनी कॅबिनेट मंत्रिपदाचा दर्जा नाकारला आहे.