रामजस कॉलेजमधील हिंसाचार प्रकरणाने राजकीय वळण घेतले आहे. या मुद्द्यावरून सोशल मीडियावर कॅम्पेन सुरू करणारी कारगिलमधील शहीदची मुलगी गुरमेहर कौरला केंद्रस्थानी ठेऊन वक्तव्ये केली जात आहेत. आता या प्रकरणात भाजप खासदाराने उडी घेत गुरमेहरची तुलना १९९३ च्या मुंबई बॉम्बस्फोटाचा मास्टरमाइंड दाऊद इब्राहिमशी केली आहे. खासदार प्रताप सिम्हा यांनी ट्विटरवर कौर आणि दाऊदचा फोटो पोस्ट केला असून त्यासमोर वादग्रस्त मजकूर टाकला आहे. किमान दाऊदने आपल्या राष्ट्रविरोधी कृत्याला योग्य ठरवण्यासाठी आपल्या पित्याच्या नावाचा वापर केला नाही, असे त्यात म्हटले आहे. माझ्या वडिलांना पाकिस्तानने नव्हे तर युद्धाने मारले आहे, असे कौरच्या हातात असलेल्या फलकावर लिहिले आहे. त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी दाऊदचा फोटो दाखवला असून त्याच्या हातातील फलकावर, मी १९९३ मध्ये लोकांना मारलेलं नाही. बॉम्बने त्यांना मारले आहे, असे म्हटले आहे. गुरमेहर कौरच्या या वक्तव्यावर सोशल मीडियावर अनेक सेलेब्रिटींनी प्रतिक्रिया दिली आहे. यामध्ये वीरेंद्र सेहवागनेही एक फोटो पोस्ट केला असून यामध्ये सेहवाग म्हणतो, मी त्रिशतक केलेलं नाही. माझ्या बॅटने ती केली आहेत, असे ट्विट त्याने केले आहे.

सेहवागच्या ट्विट्सचे अभिनेता रणदीप हुडाने समर्थन केले. त्यानंतर अनेक लोकांनी या दोघांवर निशाणा साधला. यामध्ये त्यांना समर्थन करणारेही ट्विटस मोठ्याप्रमाणावर आले. ज्येष्ठ पत्रकार शेखर गुप्ता यांनी सेहवाग आणि हुडाच्या ट्विट्सवर नाराजी व्यक्त केली. ते म्हणाले, वीरू आणि रणदीप तुमच्यासारख्या मोठ्या स्टा्र्सनी असं करणं दुखद आहे. कोणाच्याही देशभक्तीला प्रमाणपत्राची गरज नाही आणि तिच्या (गुरमेहर) वडिलांच्या अप्रतिम बलिदानाचा शिक्का आहे. प्रताप सिम्हा यांनी सेहवागचे ट्विट रिट्विट केले आहे. त्याचबरोबर त्यांनी रणदीप हुडाने पत्रकार शेखर गुप्ता यांच्या उत्तराचेही रिट्विट केले आहे. सिन्हा यांनी सेहवागच्या फोटोला आपल्या प्रोफाइलवर सर्वात वरच्या बाजूस ठेवले आहे.
रामजस कॉलेजमध्ये कथितरित्या एबीव्हीपी विद्यार्थ्यांच्या हिंसेनंतर कॅम्पेनसाठी कौरने एक फलकावर मी दिल्ली विद्यापीठात शिकते. मी एबीव्हीपीला घाबरत नाही. मी एकटी नाही. भारतातील प्रत्येक विद्यार्थी माझ्याबरोबर आहे. #स्टूडें्स अगेन्स्ट एबीव्हीपी, असा फलक हातात धरून तिने फोटो आपल्या फेसबुकवर टाकले आहे. आपल्याला बलात्काराच्या धमक्या येत असल्याचे गुरमेहर कौरने म्हटले आहे. एबीव्हीपीविरोधात कॅम्पेन सुरू केल्यानंतर सोशल मीडियावर बलात्काराच्या धमक्या येत असल्याचे तिने सांगितले.