एक्सलन्स इन जर्नालिझम’ पुरस्कार ही रामनाथ गोएंका यांना वाहिलेली आदरांजली : अरुण जेटली
संवेदनशील मनांचा थरकाप उडवणाऱ्या २०१२च्या मुझफ्फरनगर दंगलींपासून सीरिया-इराकमध्ये हाहाकार माजविणाऱ्या आयसिसच्या नृशंस कृत्यांच्या वार्ताकनापर्यंत; छत्तीसगढमध्ये कुटुंब नियोजनाच्या सदोष शस्त्रक्रियांमुळे झालेल्या मृत्यूंपासून झारखंडमधील नक्षलवादग्रस्त भागात क्रिकेटची बाराखडी गिरविणाऱ्या तरुणीच्या धडपडीपर्यंत.. पत्रकारितेतील सर्व महत्त्वाच्या स्पंदनांची नोंद घेत आठव्या ‘रामनाथ गोएंका एक्सलन्स इन जर्नालिझम’ पुरस्कारांनी या सन्मानास पात्र ठरलेल्या पत्रकारांच्या प्रयत्नांवर कौतुकाची मोहोर उमटवली. उत्कृष्ट पत्रकारितेसाठी दिले गेलेले हे २०१३ व २०१४ सालचे पुरस्कार बातमी सोप्या आणि वस्तुनिष्ठ पद्धतीने कशी सांगितली जाते, याचा आदर्श वस्तुपाठच ठरले.

या सोहळ्यात केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांच्या हस्ते ५६ पत्रकारांना हे पुरस्कार प्रदान करण्यात आले. याप्रसंगी जेटली यांनी ‘द इंडियन एक्स्प्रेस ग्रुप’चे संस्थापक रामनाथ गोएंका यांच्या गौरवशाली कार्याचा आवर्जून उल्लेख केला. रामनाथजी हे मी ओळखत असलेल्या व्यक्तींमधील सर्वाधिक प्रेरणादायी व्यक्ती होते, अशा शब्दांत त्यांनी गोएंका यांना आदरांजली वाहिली. १९७५-७७ या काळात लादण्यात आलेल्या आणीबाणीविरोधात गोएंका यांनी दिलेल्या लढय़ाचा उल्लेख करताना जेटली म्हणाले की, आणीबाणीविरोधात तुरुंगाबाहेरून लढा देणारी एकमेव व्यवस्था जर कुठली असेल, तर ती म्हणजे ‘द इंडियन एक्स्प्रेस’. ‘एक्सलन्स इन जर्नालिझम’ पुरस्कार म्हणजे गोएंका यांना वाहिलेली सर्वात उदात्त आदरांजली आहे. कारण, त्यांच्या निर्भीडतेचा वारसा सांगणारे याहून दुसरे समर्पक प्रतीक नाही.
कुठेही भ्रष्टाचार अथवा अन्याय होत असल्याचे आढळल्यास, तो उघडकीस आणणे हे वृत्तपत्राचे कर्तव्य असल्याची अविचल धारणा गोएंका बाळगून होते, असे गौरवोद्गार जेटली यांनी यावेळी काढले. वृत्तपत्र चालविणे हा एकमेव व्यवसाय असला पाहिजे, असे गोएंका यांचे आग्रही प्रतिपादन असल्याचे उपस्थितांना स्मरण करून देताना त्यांनी सध्याच्या काळात हे प्रसारमाध्यमांपुढील सर्वात मोठे आव्हान बनल्याचे सांगितले. सध्या इतर व्यवसायांतील लोक प्रसारमाध्यमे हाती घेण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यानंतर बातम्यांमधून त्यांचेच हितसंबंध प्रतिबिंबित होताना दिसतात, असेही जेटली यांनी सांगितले.

यावेळी पत्रकारितेत पाच दशकांहूनही अधिक काळ कार्यरत असणारे विख्यात पत्रकार व स्तंभलेखक कुलदीप नय्यर यांना जीवनगौरव पुरस्काराने गौरविण्यात आले. ‘द इंडियन एक्स्प्रेस’चे संपादकपद भूषविलेले नय्यर पत्रकारितेच्या आणीबाणीविरोधातील लढाईचे प्रतीक बनले होते. त्यावेळच्या सरकारी हस्तक्षेपाविरोधात निदर्शनांचे नेतृत्व करणाऱ्या नय्यर यांना अंतर्गत सुरक्षा कायद्याखाली तुरुंगात टाकण्यात आले होते.

पुण्यातील अनधिकृत इमारतींमध्ये राहणाऱ्या रहिवाश्यांसंदर्भातील वार्ताकन करणाऱ्या ‘टाइम्स ऑफ इंडिया’च्या राधेश्याम बापू जाधव यांना नागरी पत्रकारितेबद्दल प्रकाश कर्दळे स्मृती पुरस्काराने (२०१४) गौरविण्यात आले. आंध्र प्रदेशच्या नव्या राजधानीमुळे धोक्यात येऊ घातलेल्या गुंटूरमधील शेतीसंदर्भात लिखाण करणाऱ्या ‘आऊटलुक’च्या माधवी टाटा यांना पर्यावरणविषयक पत्रकारितेचा पुरस्कार (२०१४) मिळाला. ‘इंडिया टुडे’च्या शाम्नी पांडे यांना अर्थविषयक पत्रकारितेसाठी, तर मुझफ्फरनगर दंगलींच्या वार्ताकनासाठी ‘द इंडियन एक्स्प्रेस’चे दीपांकर घोष आणि व्ही. एन. अपूर्वा यांना २०१३चा ‘ऑन द स्पॉट रिपोर्टिग’साठीचा पुरस्कार मिळाला. जम्मू-काश्मीर आणि ईशान्य भारतासंबंधीच्या पत्रकारितेबद्दल ‘द इंडियन एक्स्प्रेस’च्याच ईशा रॉय यांना पुरस्कार मिळाला. रॉय यांना २०१३चा पुरस्कार मेघालयातल्या दुर्गम भागातील एका मुलीच्या बलात्कारासंदर्भातील वार्ताकनाबद्दल, तर २०१४चा पुरस्कार इरोम शर्मिला यांच्यावरील बातमीबद्दल मिळाला. या वर्षी पुरस्कारांमध्ये छायाचित्र पत्रकारिता व फीचर लेखन असे दोन नवीन विभाग तयार करण्यात आले होते. ‘द इंडियन एक्स्प्रेस’च्याच ताशी तोबग्याल यांना छायाचित्र पत्रकारितेबद्दल २०१३चा पुरस्कार मिळाला.

दूरचित्रवाणी विभागात एनडीटीव्हीच्या उमा सुधीर यांना २०१४च्या, तर सीएनएन-आयबीएनच्या दीपा बालकृष्णन यांना २०१३च्या पुरस्कारांनी सन्मानीत करण्यात आले. प्रसिद्ध अभिनेते आमीर खान यांच्या मुलाखतीचा कार्यक्रमही या वेळी झाला. एक्स्प्रेस ग्रुप व रामनाथ गोएंका फाऊंडेशनचे अध्यक्ष विवेक गोएंका यांनी उपस्थितांचे स्वागत केले. या वर्षी पुरस्कारांसाठी तब्बल ७०० प्रवेशिका आल्याचे सांगताना ते म्हणाले, ‘पुरस्कारप्राप्त बातम्यांचा उत्कृष्ट दर्जा पाहता पत्रकारितेत गुणवत्तेची अजिबात कमतरता नसल्याचे जाणवते.’

‘सेन्सॉर’वर शरसंधान
अलीकडे सेन्सॉर बोर्ड अधिकच आक्रमक झाल्याचे निरीक्षण आमिरने नोंदवले. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘स्पेक्टर’ या बाँडपटातील चुंबनदृष्याला सेन्सॉर बोर्डाने कात्री लावली आहे. त्यावरून बोर्डावर टीकेची झोड उठली असून आमिरनेही सेन्सॉर बोर्डाला टोमणे मारण्याची संधी सोडली नाही. १९९६मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘राजा हिंदुस्तानी’ चित्रपटात त्याचे अभिनेत्री करिष्मा कपूरसोबत प्रदीर्घ चुंबनदृष्य आहे. यावरून त्याला छेडले असता या बाबतीत स्वत:ला भाग्यवान समजतो, असा टोलाही त्याने बोर्डाला लगावला.

‘कुराण घेऊन माणसांना मारणारा मुस्लीम नसतो’
दहशतवादाची सांगड धर्माशी घालू नये, असे आग्रही प्रतिपादन आमिरने यावेळी केले. पॅरिसवर हल्ला करणाऱ्यांनी हातात कुराण धरले होते. असे असूनही इस्लामचा दहशतवादाशी संबंध जोडणे चुकीचे असल्याचे तुला का वाटते, असा प्रश्न त्याला विचारण्यात आला होता. त्यावेळी एखादी व्यक्ती िहसाचार करत असेल, तर आपण त्याचे नामकरण मुस्लिम अथवा हिंदू दहशतवादी असे करून मोकळे होतो. हे चुकीचे आहे. हातात कुराण घेऊन माणसांना मारणारा मनुष्य स्वतला मुस्लिम समजतो. पण, तो मुस्लिम नसतो. तो दहशतवादीच असतो, असे आमिर खान याने सांगितले.

‘रामनाथ गोएंका एक्सलन्स इन जर्नालिझम’ पुरस्काराचे २०१३ मधील विजेते प्रसारमाध्यम प्रतिनिधी. या वेळी केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली, प्रख्यात अभिनेते आमिर खान, एक्स्प्रेस समूहाच्या संचालक मंडळाचे अध्यक्ष विवेक गोएंका आदी मान्यवर.

२०१४
मुद्रित प्रसारमाध्यमे
* प्रकाश कर्दळे स्मृती नागरी पत्रकारिता पुरस्कार राधेश्याम बापू जाधव (द टाइम्स ऑफ इंडिया)
*अदृश्य भारताचा शोध – लोकमत चमू ( लोकमत)
* हिंदी – ब्रिजेश सिंग (तहलका)
* पुस्तके (वस्तुनिष्ठ ) – झियाउद्दीन सरदार ( ब्लूम्सबरी इंडिया)
* प्रादेशिक भाषा – अनिकेत वसंत साठे (लोकसत्ता)
* क्रीडा पत्रकारिता – राहुल
भाटिया (द कॅराव्हॅन)
*जम्मू-काश्मीर व ईशान्य भारताचे वार्ताकन – इशा रॉय (द इंडियन एक्स्प्रेस)
*पर्यावरण पत्रकारिता –
माधवी टाटा (आऊटलुक)
* व्यापार व अर्थविषयक पत्रकारिता – कृष्ण कौशिक (द कॅराव्हॅन)
*भारताचे वार्ताकन करणारे परदेशी पत्रकार – केटी डेगल (असोसिएटेड प्रेस)
*शोध पत्रकारिता – हाकीम इरफान राशीद/रामन किरपाल (डीएनए)
*ऑन-द-स्पॉट वार्ताकन – आशुतोष भारद्वाज (द इंडियन एक्स्प्रेस)
*विशेष लेख – सोहिनी
चट्टोपाध्याय (ओपन)
*राजकारण व सरकारसंबंधी वार्ताकन – सुप्रिया शर्मा (स्क्रोल.इन)
*छायाचित्र पत्रकारिता – दार यासीन (असोसिएटेड प्रेस), रवी चौधरी ( द न्यू इंडियन एक्स्प्रेस)
दृकश्राव्य
*अदृश्य भारताचा शोध – उमा सुधीर ( एनडीटीव्ही २४/७)
*हिंदी – शरीक रहमान खान ( एनडीटीव्ही इंडिया)
*प्रादेशिक भाषा – सानीश टीके (मनोरमा न्यूज)
*क्रीडा पत्रकारिता – कुणाल वाही (एनडीटीव्ही इंडिया)
*जम्मू-काश्मीर व ईशान्य भारताचे वार्ताकन – चित्रा त्रिपाठी (इंडिया न्यूज)
*पर्यावरण पत्रकारिता – सुशीलचंद्र बहुगुणा (एनडीटीव्ही इंडिया)
*शोध पत्रकारिता – सीमा मलिक वर्मा/शरद व्यास (झी एमपीसीजी)
*ऑन-द-स्पॉट वार्ताकन – अमिताभ पशुपती रेवी (एनडीटीव्ही २४/७)
*राजकारण व सरकारसंबंधी वार्ताकन -माऱ्या शकील (सीएनएनआयबीएन)
२०१३
मुद्रित प्रसारमाध्यमे
* प्रकाश कर्दळे स्मृती नागरी पत्रकारिता पुरस्कार – रिचर्ड जोसेफ (राष्ट्र दीपिका)
* अदृश्य भारताचा शोध – जीजो जॉन पुथेझाथ/महेश गुप्तन/ संतोष जॉन थुवल (मल्याळम मनोरमा)
* हिंदी – अतुल चौरासिया/राहुल कोटियाल (तहलका)
* पुस्तके (वस्तुनिष्ठ ) – गॅरी जे. बास (रँडम हाऊस इंडिया)
* प्रादेशिक भाषा – बिजू परावत (मातृभूमी)
* क्रीडा पत्रकारिता – अनु सिंग चौधरी (गाँव कनेक्शन)
* जम्मू-काश्मीर व ईशान्य भारताचे वार्ताकन – इशा रॉय (द इंडियन एक्स्प्रेस)/ रियाझ वणी (तहलका)
* पर्यावरण पत्रकारिता – आनंद बॅनर्जी (मिन्ट)
* व्यापार व अर्थविषयक पत्रकारिता – शाम्नी पांडे (इंडिया टुडे)
* भारताचे वार्ताकन करणारे परदेशी पत्रकार – रॉस कॉल्व्हिन (थॉमसन रॉयटर्स)
* शोध पत्रकारिता – श्यामलाल यादव (द इंडियन एक्स्प्रेस)
* ऑन-द-स्पॉट वार्ताकन – दीपांकर घोष/ व्ही. एन. अपूर्वा (द इंडियन एक्स्प्रेस)
* विशेष लेख – सौदामिनी जैन (हिंदुस्तान टाइम्स)
* राजकारण व सरकारसंबंधी वार्ताकन – आशुतोष भारद्वाज ( द इंडियन एक्स्प्रेस)
* छायाचित्र पत्रकारिता – ताशी तोबग्याल (द न्यू इंडियन एक्स्प्रेस)
दृकश्राव्य
* अदृष्य भारताचा शोध – श्रीनिवासन जैन ( एनडीटीव्ही २४/७)
* हिंदी – सुधीर चौधरी (झी न्यूज)
* प्रादेशिक भाषा – सिद्धू बिरादार ( टीव्ही ९)
*क्रीडा पत्रकारिता – विनायक दीपक गायकवाड (आयबीएन लोकमत)
* जम्मू-काश्मीर व ईशान्य भारताचे वार्ताकन – बरखा दत्त (एनडीटीव्ही २४/७)
* पर्यावरण पत्रकारिता – व्ही. सी. वेंकटपथी राजू ( टीव्ही ९)
* व्यापार व अर्थविषयक पत्रकारिता – प्रवीण गणेशराव मुधोळकर (आयबीएन लोकमत)
* शोध पत्रकारिता – प्रीती चौधरी (हेडलाईन्स टुडे)
* ऑन-द-स्पॉट वार्ताकन – कर्मा सम्तेन पल्जोर (सीएनएन-आयबीएन)
* राजकारण व सरकारसंबंधी वार्ताकन -दीपा बालकृष्णन (सीएनएन-आयबीएन)